पूनम पांड्येची सशर्त जामिनावर सुटका; दोन पोलिसांवर निलंबनाची टांगती तलवार

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

चापोली धरणावर एका मॉडेलने काढलेल्या नग्न व्हिडिओसंदर्भात काणकोणच्या पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले, तर दोन पोलिस शिपाई व धरणावरील दोन सुरक्षारक्षकांवर निलंबनाची टांगती तलवार आहे.

काणकोण : चापोली धरणावर एका मॉडेलने काढलेल्या नग्न व्हिडिओसंदर्भात काणकोणच्या पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले, तर दोन पोलिस शिपाई व धरणावरील दोन सुरक्षारक्षकांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. ‘जागृत काणकोणकार’ या झेंड्याखाली नागरिकांनी अश्‍लील व्हिडिओ काढण्यास पोलिस संरक्षण दिल्याप्रकरणी निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना त्वरित निलंबित करण्याच्या मागणीसाठी बुधवारी आंदोलन छेडले होते. तसेच ग्राह्य मागणीसाठी गुरुवारी काणकोण बंदची हाक दिली होती. सकाळी चावडी व पालिका क्षेत्रातील दुकानदारानी दुकाने बंद ठेवली होती. 

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ‘जागृत काणकोणकार’ नागरिकांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमून मागणी मान्य झाल्याने आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. यावेळी उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर, उपजिल्हाधिकारी संतोष प्रभू, काणकोण पोलिस निरीक्षक म्हणून ताबा घेतलेले निरीक्षक टेरेन डिकॉस्टा, जागृत काणकोणकारचे प्रतिनिधी सम्राट भगत, शांताजी नाईक गावकर व अन्य नागरिक उपस्थित होते. यावेळी उपसभापती फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कारवाईची माहिती घेतली व आंदोलकांना त्‍याबाबत सांगितले. मुख्यमंत्र्यांनी पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना निलंबित केले आहे. तसेच व्हिडिओ काढताना त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिस शिपायांवर व धरणावरील सुरक्षारक्षकावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे त्‍यांनी सूचित 
केले. 
मुख्‍यमंत्र्यांकडून दखल
बुधवारी संध्याकाळी ५.३० वाजता काणकोणमधील पर्यटन व्यावसायिकांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होती. त्यावेळी व्हिडिओ संदर्भातील सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. माजी मंत्री रमेश तवडकर यांनी भाजपच्या कोअर कमिटीची बुधवारी बैठक होती. त्यावेळी घडला प्रकार मुख्यमंत्र्यांना कथन करून कारवाईची मागणी केली होती. पोलिस उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी काणकोणचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना निलंबित केले आहे. त्याजागी तपास अधिकारी म्हणून टेरेन डिकॉस्टा यांची नेमणूक केली आहे. यापूर्वी या व्हिडिओ संदर्भात  अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. आता सॅम बॉम्बे व पूनम पांड्ये यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, असे उपसभापती फर्नांडिस यांनी जमावाला सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू व मामलेदार विमोद दलाल उपस्थित 
होते.

दुकानदारांना वेठीस धरण्याचा इरादा नव्हता : सम्राट भगत
काणकोणची अस्मिता मलीन होऊ नये, सरकार व प्रशासनावर दबाव येण्यासाठी काणकोण बंदची हाक देण्यात आली होती. आज नग्‍न व्हिडिओ धरणावर काढण्यात आला, उद्या काणकोण किंवा गोव्यातील युवतींना आमिषे दाखवून हे कृत्य करण्यास हे महाभाग कमी करणार नाहीत. त्यासाठी त्यांना वचक बसावा यासाठी बंदची हाक देण्यात आली. कोणावरही बळजबरी करण्यात आली नाही. बंदमुळे व्यापाऱ्याची नुकसानी झाली आहे. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. काणकोणमधील काही व्यापाऱ्यानी यासंदर्भात प्रश्नचिन्ह उभे केले होते.

त्‍यांनी कोट्यवधी कमवले, मात्र, आम्‍हाला नाहक फटका!
काणकोणात प्रत्येकवेळी लहान व्यापाऱ्यावर बंदमुळे अन्याय होत आहे. अश्‍लील व्हिडिओ काढून पूनम पांड्ये व कंपूने कोट्यवधी रुपयांची माया जमवली. पोलिसांनाही फटका बसला. मात्र, बंदमुळे काणकोणमधील सामान्य व्यापाऱ्यांना त्रास झाला. सकाळपासून काणकोणमधील दुकाने बंद राहिली. दुपारनंतर काहींनी दुकाने उघडी केली. कोरोना महामारीमुळे व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. त्यात बंदमुळे लहान व्यापाऱ्यांना व्‍हिडिओमुळे आर्थिक फटका बसल्याचे चावडी येथील एक व्यापारी संजय कोमरपंत यांनी सांगितले.

पूनम पांड्ये यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
उत्तर गोव्यातून सिकेरी येथून पोलिसांनी पूनम पांड्ये व सॅम बोम्बे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काणकोण पोलिस ठाण्यावर त्यांना आणण्यात आले. त्यावेळी उपअधीक्षक नेल्सन अल्बुकर्क यांनी पांड्ये यांनी अटकपूर्व जामिनासाठी काणकोण प्रथमसत्र न्यायालयात अर्ज दाखल केल्याचे सांगितले. पोलिस ठाण्यावरील सर्व कागदी सोपस्कार झाल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे करण्‍यात आले आणि सशर्त जामिनावर सोडण्‍यात आले. यावेळी सुमारे दहा पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
 

संबंधित बातम्या