दुरुस्ती अभावी सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था; नागरिकांची गैरसोय

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी आपण स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या मार्फत हा प्रश्न आणि समस्या सोडवणार असून सरकारला हि समस्या कथन करणार असल्याचे सांगितले.

मोरजी: पेडणे पालिका क्षेत्रात एकूण तीन सार्वजनिक शौचालय आहे . मात्र एकाही शौचालयाची सेवा नियमित नसल्याने नागरिकांची गैर सोय होत आहे . त्यात महिला वर्गाना बराच त्रास सहन करावा लागतो . याची दखल घेऊन पेडणे तालुक्यातील जागृत नागरिक , पेडणे तालुका पत्रकार समिती व सरपंच मार्फत पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस याना निवेदन देऊन ते सरकारमार्फत पोचवून त्याचा पाठपुरावा करण्याची मागणी केली .

भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस यांनी आपण स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या मार्फत हा प्रश्न आणि समस्या सोडवणार असून सरकारला हि समस्या कथन करणार असल्याचे सांगितले . पेडणे तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष निवृत्ती शिरोडकर , सचिव महादेव गवंडी , गोयचो आवाज संघटनेचे सुर्यकांत चोडणकर , पालये सरपंच  उदय गवंडी व जागृत नागरिक जयेश पालयेकर व विर्नोडा माजी सरपंच युवा वकील सीताराम परब आदी उपस्थितांनी निवेदन सादर केले . सार्वजनिक समस्यांचा पाठपुरावा स्थानिक पातळीवरून आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्याने स्थानिक संघटनेच्या नेत्या मार्फत , निवेदन सरकारला सादर करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

पेडणे पालिका शेत्रात एकूण तीन शौचालये आहेत , मागच्या ७ ते आठ वर्षापूर्वी पालिकेच्या मालकीचे शौचालय बाजारपेठेत होते , त्याची वेळोवेळी दुरुस्ती न केल्याने ते शौचालय पूर्णपणे जमीनदोस्त झाले .ते परत उभारावे यासाठी आजपर्यंत पालिकेने प्रामाणिक प्रयत्न केले नाही , शिवाय नवनवीन येणाऱ्या मुख्याधिकाऱ्याचा या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे . नागरिकांनी अनेक वेळा मागणी केली मात्र झोपलेल्या प्रशासनाला जाग आली नाही.

पेडणे पालिका क्षेत्रात भगवती हास्कुल समोर एक शौचालय, त्यानंतर कदंबा बसस्थानक आणि त्याच्या पाच मीटरवर आणखी एक सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले . हि तिन्ही  सार्वजनिक शौचालये बिन कामाची आहेत. बसस्थानकामध्ये असलेल्या सौचालयात कधी कधी पाण्याची समस्या असल्याने ते शौचालय बंद असते. शिवाय उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बसस्थानकापासून जवळच रस्त्याच्या बाजूला सोचालय उभारले होते . त्या शौचालयविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी  होत्या. अव्वाच्या सव्वा पैसे घेवून ग्राहकाची लुट केली जायची आणि हे शौचालय कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊन काळात बंद आहे .  हि पालिका आणि पेडणे शहरातील शौचालयांची स्थिती आहे .

सरकारने या शौचालयांची गंभीर दखल घेवून नागरिकाना होणाऱ्या गैरसोयी दूर कराव्यात अशी मागणी केली आहे .

पालयेचे सरपंच उदय गवंडी यांनी प्रतिक्रिया देताना पेडणे तालुक्यातील विविध भागातून लोक आपापल्या कामानिमिताने पेडणे शहरात येतात, मात्र शौचालयाची सोय नसल्याने गैर सोय होते . सरकारने हि समस्या सोडवावी अशी मागणी सरपंच उदय गवंडी यांनी केली .

गोयचो आवाज संघटनेचे सुर्यकांत चोडणकर यांनी प्रतिक्रिया देताना , लोकप्रतिनिधी जर जागृत असेल तर कोणतीही समस्या लगेच सुटण्यास हातभार लागतो . मात्र पेडणे शहरातील समस्या गंभीर बनलेल्या आहेत. त्या निदान आतातरी सोडवाव्यात अशी मागणी सुर्यकांत चोडणकर यांनी केली .

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या