मंत्री लोबो यांचा सरकारला घरचा आहेर, जबाबदारी कचरा व्यवस्थापनकडे देण्याची मागणी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

लाखो रुपये खर्च करून पर्यटन खात्यामार्फत कांदोळी तसेच बागा येथील किनारी भागात  उभारण्यात आलेल्या पर्यटक स्वच्छता गृहांची दयनीय अवस्था संबंधित खात्यामुळे झालेली आहे.

शिवोली :लाखो रुपये खर्च करून पर्यटन खात्यामार्फत कांदोळी तसेच बागा येथील किनारी भागात  उभारण्यात आलेल्या पर्यटक स्वच्छता गृहांची दयनीय अवस्था संबंधित खात्यामुळे झालेली आहे. येथील शौचालयांच्या वापरासाठी संबंधित कंत्राटदाराकडून दुप्पट-तिप्पट दर आकारण्यात येत असल्याने स्थानिकांबरोबरच पर्यटकांनीही पाठ फिरवली असल्याचा गंभीर आरोप करीत कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांनी सरकारला घरचा आहेर दिला.

पर्रा येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परीषदेत मंत्री लोबो बोलत होते. 
येथील स्वच्छता गृहांची निगा तसेच व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आपल्या अखतारीत असलेल्या कचरा व्यवस्थापन खात्याकडे दिल्यास भविष्यात तक्रारींना जागा राहणार नसल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. गोव्यातील पर्यटनाचा भार येथील किनारी भागावर अधिकाधिक अवलंबून आहे. तथापि संबंधित खात्याकडून येथील स्वच्छता तसेच सुव्यवस्थेची काळजी न घेतल्यास भविष्यात पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची भीती मंत्री लोबो यांनी यावेळी बोलून दाखविली. पर्यटन खात्याची जबाबदारी सध्याचे मंत्री मनोहर आजगावकर सांभाळू शकत नसल्याने या खात्याची जबाबदारी अन्य मंत्र्याकडे सोपविली जाणार काय, या प्रश्नावर मौन साधताना याबाबतीत अंतिम निर्णय खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच घेणार असल्याचे त्यांनी सावध पवित्रा घेत सांगितले. 

दरम्यान, मारिना प्रकल्प अर्थातच पाण्यावर तरंगणारी जेटी दक्षिणेत नको असल्यास कळंगुटात आपण या प्रकल्पाचे निश्चितच स्वागत करणार असल्याचे लोबो यांनी सांगितले. राज्यात स्थानिक तरुणांना रोजगार प्राप्त करून देणारे प्रकल्प आणणे काळाची गरज असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले. प्रत्येक प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन छेडणारे राज्याचा विकास रोखण्याचा अप्रत्यक्षपणे प्रयत्न करत असल्याचा आरोप मंत्री लोबो यांनी यावेळी केला. स्थानिक पंचायत तसेच मच्छीमारांची संमती असल्यास आपण हा प्रकल्प कळंगुट पंचक्रोशीत वळविण्यास प्रयत्नशील राहाणार असल्याने त्यांनी पत्रकारांना सांगितले.

संबंधित बातम्या