अमली पदार्थांच्या व्यवहाराला चाप लागण्याची शक्यता

प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

अमलीपदार्थ नियंत्रण विभाग (नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, एनसीबी) सक्रीय झाल्यामुळे राज्याच्या किनारी भागातील अमली पदार्थांच्या व्यवहाराला आणखीन चाप लागण्याची शक्यता आहे.

पणजी:  अमलीपदार्थ नियंत्रण विभाग (नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, एनसीबी) सक्रीय झाल्यामुळे राज्याच्या किनारी भागातील अमली पदार्थांच्या व्यवहाराला आणखीन चाप लागण्याची शक्यता आहे. गोव्यातील अशा व्यवहारांचे संबंध थेट मुंबईत असल्याचे उघड झाल्यानंतर आणखीन १८ जणांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे या एनसीबीने ठरवल्यानंतर त्यात गोव्यातील कोणाचा समावेश आहे का? याची चर्चा सुरु झाली आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केल्यानंतर तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाल्याची माहिती आहे. त्यानुसार एनसीबीने १८ जणांची यादी तयार केली आहे. या सर्वांना चौकशीचे समन्स पाठविण्यासाठी एनसीबी अधिकारी के. पी. एस मल्होत्रा दिल्लीला रवाना झाले असून, ते मुंबईत एनसीबी संचालक राकेश अस्थाना यांच्याशी चर्चा करीत निर्णय घेणार असल्याची माहिती एनसीबी सूत्रांनी दिली. त्यामुळे गोव्यापर्यंत हे प्रकरण पुन्हा येऊन थडकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

एनसीबीने तयार केलेल्या १८ जणांच्या यादीमध्ये बॉलीवूडसह काही उद्योजकांचादेखील समावेश आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. यामुळे या प्रकरणाचे धागे हॉटेल व्यावसायिकांपर्यंत पोचणार की काय असे वाटू लागले आहे. अद्यापही हे १८ जण कोण याविषयी ठोस माहिती मिळत नाही. एनसीबीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनीही आपल्याला काही ठाऊक नाही, दिल्लीतूनच या साऱ्याची सुत्रे हलतील अशी भूमिका घेतली आहे याप्रकरणी जैद आणि बशीद या दोन संशयितांकडून एनसीबीने अमली पदार्थ व्यवहारांची महत्त्वपूर्ण माहिती घेतली आहे.

 त्या व्यवहारांचे धागेदोरे गोव्यापर्यंत पोचत असल्याने एनसीबी चौकशीसाठी पून्हा गोव्यात येऊ शकते असे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या