डिचोलीत चतुर्थीकाळात आर्थिक उलाढालीवर परिणाम शक्‍य..!

Tukaram Sawant
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

आर्थिकदृष्ट्या भक्‍कम म्हणून ओळखण्यात येणाऱ्या डिचोली शहराला खाणबंदीची मोठी झळ बसल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यातच यंदा एकाबाजूने खाणबंदी तर दुसऱ्या बाजूने कोरोना महामारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे यंदा चतुर्थी सणकाळात नवीन कपडेलत्ते, टि.व्ही. आदी इलॅक्‍ट्रॉनिक उपकरणे आदी महागड्या वस्तू खरेदी करण्यास अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमीच आहे

डिचोली,  हिंदू धर्मियांचा मोठा आणि उत्साहवर्धक चतुर्थी सण आठवड्यावर आला असला, तरी यंदा म्हणावा तसा चतुर्थीचा उत्साह अजूनतरी जाणवत नाही. डिचोलीतील बाजारपेठेत अपेक्षेप्रमाणे चतुर्थीचा माहोलही तयार झाल्याचे दिसून येत नाही. यंदा या सणाला ‘कोरोना’चे गालबोट लागल्याने बाजारात अजूनतरी अपेक्षेप्रमाणे चतुर्थीची खरेदीसाठी बाजारात गर्दीही झालेली नाही. त्यामुळे ‘कोरोना’ संकटामुळे यंदा चतुर्थीकाळात आर्थिक उलाढालीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
परंपरेप्रमाणे  घरोघरी विघ्नहर्त्या गणरायाचे पूजन करून ‘चवथ’ साजरी करण्यात येणार असली, तरी कोरोना महामारीच्या धोक्‍यामुळे यंदा मोठा गाजावाजा न करता बहुतेक ठिकाणी चतुर्थी साध्या पद्धतीने साजरी होणार असल्याचे काही लोकांनी सांगितले. गेल्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने साध्या पद्धतीने का होईना, एकदाचे विघ्नहर्त्याने हे संकट दूर करून चतुर्थी निर्विघ्नपणे साजरी होऊ दे, अशीच प्रार्थना गणेशभक्‍त करीत आहेत.
सार्वजनिक मणेशोत्सव मंडळांनेही सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देवून दीड दिवसांची चतुर्थी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. चतुर्थी साजरी करण्यावर मर्यादा आल्याने, साहजिकच यंदा बाजारात नवनवीन वस्तू खरेदीवरही मर्यादा येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

बाजारपेठेवर परिणाम...
आर्थिकदृष्ट्या भक्‍कम म्हणून ओळखण्यात येणाऱ्या डिचोली शहराला खाणबंदीची मोठी झळ बसल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यातच यंदा एकाबाजूने खाणबंदी तर दुसऱ्या बाजूने कोरोना महामारीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे यंदा चतुर्थी सणकाळात नवीन कपडेलत्ते, टि.व्ही. आदी इलॅक्‍ट्रॉनिक उपकरणे आदी महागड्या वस्तू खरेदी करण्यास अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. या खरेदीवर बऱ्याच मर्यादा येणार असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे सध्यातरी डिचोली बाजारपेठेतील रेडीमेड आदी कपड्यांचे व्यापारी, इलॅक्‍ट्रॉनिक आदी शोरुमवाले आदी व्यावसायिक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक दरवर्षी चतुर्थीला साधारण पंधरा दिवस असतानाच, विविध आस्थापनांतून खरेदीला जोर येत होता. यंदा मात्र, अजूनही तसेच चित्र डिचोलीतील बाजारपेठेत दिसून येत नाही. खप होणार नसल्याने काही दुकानदारांनी तर नवीन मालही अद्याप उपलब्ध केला नसल्याचे समजते. आधीच खाणबंदीमुळे मागील दोन वर्षांपासून चतुर्थी आणि दिवाळी या मोठ्या सणात आर्थिक उलाढालीवर परिणाम जाणवलेला आहे. यंदा तर खाणबंदीबरोबरच कोरोनाचे संकट असल्याने यंदा चतुर्थी काळात खरेदीला अपेक्षीत प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमीच आहे, असे मत बाजारातील काही व्यावसायिकांनी व्यक्‍त केले आहे.

संबंधित बातम्या