दहावीची परीक्षा पुढे ढकलावी

Dainik Gomantak
बुधवार, 20 मे 2020

गोवा शालान्‍त मंडळ अध्‍यक्षांकडे विद्यार्थ्यांची मागणी

पर्वरी

कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी करीत आज सहा विद्यार्थ्यांच्‍या एका गटाने गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांची भेट घेतली. श्री. सामंत यांनी एका विद्यार्थ्याला आपल्या केबिनमध्ये बोलावून त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व परत पाठविले.
सध्‍या कोरोना विषाणूचे संक्रमण झपाट्याने होत असून सरकार परीक्षेच्या दरम्यान कोणती खबरदारी घेणार, याचा खुलासा करीत नाही. जर परीक्षेच्या दरम्यान एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली, तर कोणाला जबाबदार धरायचे. त्यासाठी सरकारने परीक्षा पुढे ढकलाव्या, असे मत एल. डी. सामंत विद्यालयाचा विद्यार्थी मोहित चव्हाण याने व्यक्त केले.
सध्‍या हे प्रकरण उच्च न्यायालयात असल्याने गोवा शालान्त मंडळाच्‍या अध्यक्षांनी त्‍यावर भाष्‍य करणे टाळले. तसेच वरिष्ठ अधिकारी जे सांगतात त्‍याचे पालन आम्‍हाला करावे लागते. त्यांचा जो निर्णय असेल, तो आम्हाला मान्य आहे. परीक्षा पुढे ढकलाव्या, रद्द कराव्या, असा पालक, विद्यार्थी यांच्याकडून आमच्यावर दबाव येत आहे, असे विद्यार्थी संघटनेचा नेता अहराज मुल्ला यांनी अध्यक्ष श्री. सामंत याला भेटून आल्यावर सांगितले. गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी कोणतीच प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. सध्‍या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून उद्या (ता.२०) रोजी निकाल अपेक्षित आहे.

का परीक्षा पुढे ढकलाव्‍यात?
सरकार आमच्या सुरक्षेबाबतीत काहीच सांगत नाही. त्यामुळे आम्ही प्रचंड दबावाखाली आहोत. आम्हाला परीक्षा द्यायची भीती वाटते. तसेच कायम मास्क घालून परीक्षा कशी द्यायची, यासह अन्‍य समस्‍या आमच्‍यासमोर आहेत. त्यासाठी दहावीच्या परीक्षा त्वरित पुढे ढकलाव्यात.
-अर्चित सांगेलकर, विद्यार्थी

सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. दहावीची परीक्षा घेताना कोणतीही सुरक्षेबाबतची पावले उचलली आहेत, हे अजूनपर्यंत स्पष्ट सांगत नाही. सध्‍या गोव्‍यातील इस्‍पितळात खूप कमी प्रमाणात व्‍हेंटिलेटर आहेत. जर परीक्षेच्या दरम्यान एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली, तर मोठा गोंधळ निर्माण होईल. त्यासाठी सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा. तसेच गोवा विद्यापीठाने प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत.
-सिमरन मळर्णेकर, विद्यार्थिनी.

संबंधित बातम्या