वीजमंत्र्यांनी जाणून घेतल्या वीज समस्या

Manoday Phadte
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

रिवण, नेत्रावळी, कावरे पिर्ला या भागातील जनतेला खंडित वीजपुरवठ्यासंदर्भात सतत तोंड द्यावे लागत असल्याने तेथील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगेचे आमदार प्रसाद गावकर, सरपंच, पंच व वीज ग्राहकांबरोबर बैठक घेऊन विविध समस्या जाणून घेतल्या.

कुडचडे

उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने ज्या गोष्टी करणे शक्य आहे, त्या त्वरित करा. त्यात कोणत्याही प्रकारची हयगय खपून घेणार नसल्याचा इशारा वीज अधिकाऱ्यांना दिला. यावेळी वीजमंत्र्यांनी रिवण व कावरेपिर्ला ग्रामपंचायत भागात ३३ केव्ही भूमिगत वीजवाहिन्या घालण्यासाठी मंजुरी द्यावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे उपस्थितांना सांगितले.
वीजमंत्री पुढे म्हणाले, की काम होण्यासाठी सतत पाठपुरावा महत्वाचा आहे. अधिकारी बदलत असतात सहा महिन्यातून एकदा विषय सांगून काम होत नसते. त्यासाठी सरपंच, पंच यांनी पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले. नेत्रावळीत ३४ कोटी रुपये खर्चून भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरू केले होते, पण अंतिम टप्प्यात कोरोना महामारीमुळे कामगार गेल्याने काम बंद पडले असले तरी पुढील चार पाच महिन्यांत काम पूर्ण होणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केला. काही ठिकाणी वीज खात्याला लोक खांब किंवा ट्रान्स्फर्मर घालण्यासाठी दहा मीटर जागा देत नाही याची खंत व्यक्त करून सुरळीत वीजपुरवठ्यासाठी जनतेने वीज खात्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
वादळ वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ लागला असून दहा तारखेनंतर वीजवाहिन्या स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असून चतुर्थीपूर्वी सुरळीत वीजपुरवठा होणार याची काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार प्रसाद गावकर म्हणाले, की ३३ केव्ही वीजवाहिन्यांखालील किमान दहा मीटर आसपासची झाडे छाटणे आवश्यक आहे. त्याचबरोबर वीज खाते आणि वन खाते एकत्र येऊन काम केल्यास बऱ्याच अडचणीत दूर होणार आहेत. सांगे भागात वीजपुरवठ्यासंदर्भात खूप अडचणी असल्यामुळे वीजमंत्री आणि सरपंच, पंच, नागरिक यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला असून या बैठकीतून नक्कीच चांगला पर्याय मिळणार असल्याचे आमदार प्रसाद गावकर यांनी सांगितले.
या बैठकीत वीज खात्याचे कार्यकारी अभियंता विनायक म्हाळशेकर, सहाय्यक अभियंता अनिल गावकर, दिनेश गोमीस, रिवणचे सरपंच सूर्या नाईक, नेत्रावळीचे पंच अभिजित देसाई, कावरेपिर्लाचे पंच राजेंद्र फळदेसाई, टोळयो गावकर, कुष्ठ मायनाथ, सुहास प्रभू गावकर, मंगेश देविदास, विश्वजिता जांबवलीकर, सर्वेश वेळीप, लुईझा फर्नांडिस, संदेश गावकर इतर पंच सदस्य व मोठ्या प्रमाणात नागरिक हजर होते.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या