गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांना दाखवणार पेडणेवासीय जागा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

आगामी विधानसभेत पेडण्याची माती उपमुख्यमंत्री व पेडण्याचे आमदार बाबू आजगावकर यांना जागा दाखवून देतील असे ठाम वक्तव्य गडेकर यांनी प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केले.

पणजी: पेडण्यातील भाजप गट मंडळाचे माजी अध्यक्ष प्रशांत गडेकर यांनी आज गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांना श्रीफळ व पक्षाची निशाणी असलेला उपरणे गळ्यात घालून स्वागत केले. विद्यमान आमदाराचे सध्या पेडण्यात माफियाराज असल्याने लोकांमध्ये खदखद आहे. या आगामी विधानसभेत पेडण्याची माती उपमुख्यमंत्री व पेडण्याचे आमदार बाबू आजगावकर यांना जागा दाखवून देतील असे ठाम वक्तव्य गडेकर यांनी प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केले.

 पेडणे पालिका निवडणूक गडेकर यांच्या नेतृत्वाखाली गोवा फॉरवर्डच्या पाठिंब्याने लढविली जाणार आहे. स्थानिक आमदाराच्या भ्रष्टाचाराला पेडण्यातील लोक कंटाळलेले आहेत. त्यांना मतदारसंघातील स्वतःचा उमेदवार हवा आहे. भाजपने प्रत्येकवेळी आयात केलेला उमेदवार पेडणे मतदारांना दिला आहे तो त्यांना मान्य नाही. त्यामुळे यावेळी भाजपकडून पेडण्याच्या विद्यमान आमदाराला उमेदवारी मिळण्याची नाकारू शकतात असे मत आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.   

पालिका निवणडूक जाहीर करून सरकारने आरक्षण व फेररचनेत घोळ करून ठेवला आहे व त्याविरोधात काहीजण न्यायालयात गेले आहेत. हा घोळ झाला असला तरी गोवा फॉरवर्ड पक्ष निवडणुकीस तयार आहे. भाजप सरकार पक्षपातळीवर निवडणूक घेण्यास घाबरले आहे मात्र गोवा फॉरवर्ड पक्ष तयार होता. या भ्रष्टाचारी व जातीयवाद सरकारच्या मुक्तीसाठी भाजपविरोधातील सर्वांना एका छताखाली आणण्याचा प्रयत्न आहे तसेच प्रयत्न राहणार आहे. मडगाव पालिका निवडणूक विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड व गोवा फॉरवर्ड यांच्यात प्रभाग वाटपावरून चर्चा झाली आहे. त्यामुळे या पालिका निवडणुकीत भाजप समर्थक उमेदवारांच्या पॅनलविरोधात आमच्या तिघांचे पॅनल एकत्रित प्रभागामध्ये उमेदवार उभे करणार आहे. म्हापसा पालिकेतही भाजपविरोधातील समविचारी पक्षांबरोबर समझोता केला जाईल असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या