गोवा मुक्तीदिनापूर्वी पाणी समस्या सोडवा; पिण्यास पाणी न देता ‘सुके पोहे व गुळ खा’ असा संदेश देण बंद करा: प्रशांत नाईक

दैनिक गोमन्तक
बुधवार, 9 डिसेंबर 2020

काणकोणच्या पाणी प्रश्नावरून सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. दीपावलीपासून काणकोणात अनियमित पाणीपुरवठा होत आहे.

काणकोण: पिण्यास पाणी न देता ‘सुके पोहे व गुळ खा’, असा संदेश भाजप सरकारने दीपावली काळात काणकोणवासीयांना दिला असल्याचा गंभीर आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत करीत काणकोणच्या पाणी प्रश्नावरून सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. दीपावलीपासून काणकोणात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. काही भागात सलग दहा दिवस पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे गोवा मुक्तीदिनापूर्वी काणकोणचा पाण्याचा प्रश्न सरकारने न सोडल्यास गोवा फॉरवर्ड पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशांत नाईक दिला आहे.

पिण्यास पाणी नाही, त्याचबरोबर पावसाळा संपून दोन महिने झाले तरी बंधाऱ्यात पाणी अडवण्यात आले नाही. वायंगण शेतीसमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. काही मूलभूत प्रश्न सोडवण्यास भाजप सरकारला अपयश आले आहे. या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी सरकार गोव्याच्या मुक्तीच्या साठाव्या वर्षी शंभर कोटी रूपये खर्चून कार्यक्रम करू पाहत आहेत. त्याला आमच्या पक्षाचा विरोध आहे. त्या ऐवजी मुक्तिदिनी लोककल्याणकारी योजना राबवा, स्वातंत्रसेनानींचा मानसन्मान करा, त्यांच्या कुटुंबीयांसाठी योजना सुरू करा असा सल्ला नाईक यांनी दिला आहे. 

राज्यात सुमारे १३० वाचनालये चालवण्यात येतात. त्या वाचनालयातील ग्रंथपाल व अन्य कर्मचाऱ्यांना गेले पाच महिने वेतन देण्यात आलेले नाही. सुरक्षा रक्षकांना अर्धे वेतन देण्यात आले आहे. त्यांना पहिल्यांदा वेतन देऊन नंतर कार्यक्रम करा, असेही त्यांनी सांगितले. सरकार सर्वच पातळ्यांवर अयशस्वी ठरले आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील, असा विश्र्वासही प्रशांत नाईक यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या