दोन ध्रुवावर दोघे

family
family

खूप दिवसांनी होणारी भेट ही तितकीच खास आणि आर्त असली पाहिजे. दूर राहून नाते पूर्वीसारखेच टिकवून ठेवायचं म्हणजे दोघांसाठीही एक आव्हान असतं. लोकांच्या मते ते जास्त काळ टिकून राहू शकत नाही म्हणून नातं टिकवून ठेवायचं असेल तर विचारात सकारात्मकता असावी लागते.

सध्याचे चित्र पाहता समाजाची रचनाच बदलत चाललीय असं वाटतं. आधी एकत्र कुटुंबे होती मग कालानुरूप त्यात बदल होत होत कुटुंबापासून कुटुंबे दूर होत गेली. विभक्त कुटुंबांची पद्धत दृढ झाली. एका घराची चार घरं झाली. कामासाठी धंद्यासाठी पुरुष माणसे घर सोडून दुसऱ्या गावी जाताना दिसू लागली. मग ते बायकांना पोरांना घेऊन त्या त्या गावी आपली कुटुंबे स्थापित करू लागली. समाज  रचनेत अशा प्रकारे एक लाईफ डिस्टन्सिंग आलं. 

सध्याच्या संगणकीय युगात नवरा-बायको यांच्या नात्यातही एक यांत्रिकपणा येऊ लागलाय असं वाटू लागलंय. लग्न झाल्यानंतर दोघे एकत्र राहतीलच अशी शाश्वती वाटेनाशी झालीय .आजकाल मुलीही स्वतंत्रपणे स्वत:च्या पायावर उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे तिचं करिअर, तिचा जॉब, तिचं स्वातंत्र्य तिची प्रायोरिटी याकडेही लक्ष द्यावं लागतंय. दोघांची नोकरी जर एका गावी किंवा शहरी असेल तर ठीक आहे नाहीतर नोकरीच्या कारणास्तव त्यांना  वेगवेगळं  राहावं  लागतं. चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी सोडणं हे परवडणारं नसतं. पैशाची गरज तर असतेच. मग जवळची गावे असतील तर आठवड्याने किंवा पंधरा दिवसांनी भेटी होऊ शकतात. पण काहीजण परदेशाची वाट धरतात त्यांना वर्ष, वर्ष घराकडे येता येत नाही. सध्या तर माझ्या पाहण्यात आजूबाजूला, नात्यात अशी बरीच उदाहरणे आहेत जी काही कारणास्तव अशी वेगवेगळी राहतात. काही तर एकमेकांशी पटत नाही रोज उठून भांडाभांडी करत बसण्या पेक्षा मुद्दाम दुसऱ्या गावी बदली करून घेतात आणि वेगवेगळे राहतात.आणि अशा कुटुंबात जर मुले असतील, तर त्यांना आईवडिलांच्या  विभक्त राहण्याचे परिणाम भोगावे लागतात. एका कुटुंबातल्या मुलीला मुंबईला नोकरी तर तिच्या नवऱ्याला दिल्लीला तो तिकडे ही इकडे. एका कुटुंबात वयस्क आई असल्याने तिच्या देखरेखीसाठी बायकोला घरी ठेवून तो बदलीच्या गावी गेला.एका मुलीला प्रमोशनवर दुसऱ्या शहरात पाठवत होते पण नवरा मुलगा यांना सोडून जाता येणार नाही म्हणून तिला नोकरी सोडायला लागली तिने अट्टहासाने जॉब घेतला असता तर दोघांना विभक्त रहाण्याशिवाय पर्याय नव्हता. एक असेच त्रिकोणी कुटुंब तिथे दोघांचा इगो आड येत होता,आढ्यतेखोर स्वभावामुळे  कुणी नमतं  घ्यायचं  ठरवता येत नव्हतं, त्यामुळे घरचा त्रिफळा उडाला.  मुलगा मोठा आठवी नववीत अशावेळी दोघांना घटस्फोट घेणं ही अवघड होऊन बसलं.  मग त्याने शहाणपणा करून आपली बदली दुसरीकडे करून घेतली मुला समोर सतत वादावादी होऊन त्याच्यावर तेच संस्कार होतील याचा विचार करून ते विभक्त राहू लागले. कधी मुलासाठी तो घरी येतो त्याला भेटायला. एक आणखी चौकोनी कुटुंब दोन मुले मुलांनी आपल्या आई वडिलांसह एकत्र राहावं दोघांचेही प्रेम आपल्याला मिळावं ही अपेक्षा कारण काही चुकीचं नाही. पण  स्वभाव पटत नसल्याने चौकोनाच्या चारी कोनाची तोंडे चार बाजूला, उद्या मुले आईवडिलांचा कित्ता गिरवणार कधी कधी. 

तू तिकडे अन मी इकडे
वाऱ्या‍यावरती जशी चुकावी 
रानपाखरं दोन्ही कडे 

माणसे दूर राहू लागली, की अधिक दुरावतात. ही गोष्ट त्या दोघांबाबत ही घडू शकते. पण जर दोघांमधे विश्वास, समजूतदारपणा, प्रेम असेल तर नातं टिकण्यास मदत होते. जरी ते  कित्येक मैल दूर रहात असतील तरी मनाने दूर जाऊ शकत नाही. पण कधी कधी कामाच्या व्यापा मुळे संवाद आणि संपर्क हरवला तर अशी जोडपी मग मनाने संवेदना शीलही रहात नाहीत. जे जोडीदार लॉँग डिस्टन्स्टन्स मध्ये रहातात त्यांच्या बाबतीत व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव वेगळा असू शकतो. वैवाहिक नात्यात आपलेपणा प्रेम आणि अधिकार ही असतोच त्यामुळे विश्वासाची पदोपदी कसोटी लागत असते. जरी तो किंवा ती दूर रहात असेल तरी तो किंवा ती आपल्याशी प्रामाणिक आहे आणि पुढेही असेल हा मनातलं विश्वास दोघांमधलं नातं दृढ करतो. आयुष्यात समोर ठिकठिकाणी वेगवेगळी प्रलोभने उभी ठाकतात पण त्यात न अडकता आपल्या जीवलगासाठी असलेलं प्रेम विश्वास शाश्वत आणि अढळ ठेवण्याचा मनाचा इरादा मनात असावा लागतो,  

 तर ते नातं शंभर टक्के निभावलं जातं. संशयी वृत्ती आणि त्यामुळे मनात निर्माण होणारे गैरसमज मनात एकमेकांविषयी कटुता  निर्माण करतात मग त्यातून वादावादी, अनबन आणि एकमेकांना जिव्हारी लागेल अशी भोचक बोलणी याने दोघेही दुखावले जाऊ शकतात. त्यासाठी  

मनावर नियंत्रण विश्वास आणि वेळोवेळी एकमेकांशी संवाद साधणं गरजेचं असतं. त्यामुळे मन मोकळं बोलणं होतं. हेही हवच. फोन उचलला नाही, फोन बंद ठेवला असं कुठलंही फुटकळ कारण संशयाची जागा घेऊ शकतं. क्षुल्लक गोष्टीतून पराकोटीचा वाद होऊ शकतो. एकमेकांचे वाढदिवस महत्वाच्या खास गोष्टी कामाच्या व्यापात विसरणं हेही एक कारण घडू शकतं दूर असल्याने नक्की तिथल्या परिस्थितीचा अंदाज येत नाही मग मनात वादळे उठू लागतात आणि आहे त्या परिस्थितीत आगीत तेल ओतायचं काम करतात. त्यासाठी  जेव्हा जेव्हा एकत्र रहायची संधी जोडप्याला मिळते तेव्हा ते क्षण पूर्णपणे एकमेकांसाठी समर्पित असले पाहिजे. कारण ते सुखद क्षण मनाशी बाळगून पुढचे काही दिवस ते परत कामाच्या ठिकाणी गेल्यावर ते आठवत मन रमवतील. ती हुरहूर पुन्हा परत अनुभवावीशी वाटली पाहिजे, पण जर दोघे जवळ आल्यावर भांडणेच होत असतील तर नको ते एकत्र रहाणं दूर राहिलेलंच बरं असं वाटू लागेल. तू माझ्या सोबत असणं किती गरजेचं आहे हे दोघांनी एकमेकांना पटवून दिलं, तर ते पुन्हा पुन्हा एकत्र यायला उद्युक्त होतील. नाहीतर एकमेकांची पर्वाच नाही असं वागणं असेल तर समोर येणारं चित्र फारसं आशादायक नसेल मग तू तिकडे मी इकडे बरं असाच वाटू लागतं. दोघेही एकमेकांसाठी पूरक आहेत हे दोघांना ठाऊक असायला पाहिजे. काही प्रसंगवशात दोघांना मनात नसताना दूर रहावं लागत असेल, तर दोघांचं मानसिक भावनिक नातं हे जास्त प्रगल्भ असलं पाहिजे. दूर अंतरावर राहूनच एकमेकांच्या ‘असण्याची’ किंमत कळली पाहिजे. अशावेळी दूर अंतरावरची नाती जास्त यशस्वी ठरतील. खूप दिवसांनी होणारी भेट ही तितकीच खास आणि आर्त असली पाहिजे. दूर राहून नाते पूर्वीसारखेच टिकवून ठेवायचं म्हणजे दोघांसाठीही एक आव्हान असतं. लोकांच्या मते ते जास्त काळ टिकून राहू शकत नाही म्हणून नातं टिकवून ठेवायचं असेल तर विचारात सकारात्मकता असावी लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com