विघ्नहर्त्यास साकडे

.
रविवार, 23 ऑगस्ट 2020

अथर्वशिर्षामधील ॐ गं गणपतये नमः हा जो सिध्दमंत्र आहे, त्याचा ध्यास धरावा. आपला श्‍वास या सिध्दमंत्राला जोडावा, कारण आपल्याला एखादे कार्य साध्य करायचे असेल, तर आपापसातील पक्षभेद, धर्मभेद, जातीभेद विसरून एकत्र यावे, हीच मूळ कल्पना या मंत्रांमध्ये आहे.

अथर्वशिर्षामधील ॐ गं गणपतये नमः हा जो सिध्दमंत्र आहे, त्याचा ध्यास धरावा. आपला श्‍वास या सिध्दमंत्राला जोडावा, कारण आपल्याला एखादे कार्य साध्य करायचे असेल, तर आपापसातील पक्षभेद, धर्मभेद, जातीभेद विसरून एकत्र यावे, हीच मूळ कल्पना या मंत्रांमध्ये आहे.

नेमेचि येणाऱ्या पावसाचा नेम कधी कधी चुकतो. तो वेधशाळेने घेतलेला वेध चुकवून आधीच बरसतो, तर कधी आठवडा पंधरवडा उलटून गेल्यावर त्याचे आगमन होते, पण श्री गणरायाचे तसेच नाही. हिंदू पंचांगाप्रमाणे भाद्रपद शुध्द चतुर्थी म्हणजे गणेशचतुर्थी, अर्थात इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा उत्सव कधी ऑगस्ट, तर कधी सप्टेंबर महिन्यात येतो.

यंदा शनिवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी आगमन होणाऱ्या गणरायाचे मनासारखे स्वागत करता येणार नाही याची खंत साऱ्याच गणेशभक्तांना लागून राहिली आहे आणि याचे एकमेव कारण म्हणजे कोरोनाच्या विषवल्लीचा वाढता फैलाव. या विषाणूने पण साऱ्या जगालाच वेठीस धरले आहे आणि अर्थातच त्याला आपला भारत देशही अपवाद नाही. गोव्याबाबत निराळे ते काय सांगावे? येथे सुरवातीला या विषाणूला एकही बळी तर पडला नव्हताच, पण रुग्ण संख्यासुध्दा हाताच्या बोटावर मोजण्याइतकी अत्यल्प होती. दुर्दैवाने आज या महामारीच्या महासंकटाने इतके रौद्ररूप धारण केले आहे, की हा लेख लिहिताना बळींची संख्या सव्वाशेच्या घरात पोहोचत आली आहे, तर रुग्ण संख्येने तब्बल बारा हजारापर्यंत पोहोचली आहे. एखाद्या कसदार फलंदाजाने चौकार, षटकार मारत धावसंख्या सतत वाढती ठेवावी तसेच या महामारीचे झाले आहे आणि म्हणून या महामारीचा नायनाट करण्यासाठी ‘देव तारी त्याला कोण मारी’ या श्रध्देने व भावनेने श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्या विघ्नहर्त्यास साकडे घालणे हेच आपल्या हाती आहे. तो जसा सुखकर्ता आहे, तसाच तो दुःखहर्ताही आहे. म्हणून वाढता वाढता वाढे, अशा या विषवल्लीला काबूत आणण्यासाठी ‘घरीच रहा, सुरक्षित रहा’, हा मंत्र जप आणि ॐ गं गणपतये नमः म्हणून या सिध्दीविनायकाला शरण जाणे हेच आपल्या हाती आहे.

खरं तर, हा श्री गणेश म्हणजे ज्ञानातून विज्ञान आणि विज्ञानातून आत्मज्ञान असा एकूण प्रवास आहे. आत्मिकता आणि आद्यलिकता या दोहोंचाही हा गणनायक म्हणजे उत्तम संगम आहे आणि म्हणून गणपती अथर्वशिर्षामधील ॐ गं गणपतये नमः हा जो सिध्दमंत्र आहे, त्याचा ध्यास धरावा. आपला श्‍वास या सिध्दमंत्राला जोडावा, कारण आपल्याला एखादे कार्य साध्य करायचे असेल, तर आपापसातील पक्षभेद, धर्मभेद, जातीभेद विसरून एकत्र यावे, हीच मूळ कल्पना या मंत्रांमध्ये आहे. या मंत्राचे तंत्र आणि आपली शुध्द श्रध्दा भक्ती, भावना या गणाधिशाच्या चरणी रूजू झाली की तो संकटमोचक बनून आपल्याला या वाढलेल्या विषाणूच्या जहराच्या कहरातून मुक्त करणार आहे, हे निश्‍चित.

क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी आणि थोर द्रष्टे नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरवात केली. त्याची प्रामुख्याने दोन कारणे होती. पहिले म्हणजे ब्रिटिशांच्या जुलमाखालचा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळ मजबूत करणे. या चळवळीचे महत्त्व विशद करून सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांना या चळवळीत सामावून घेणे आणि दुसरे समाजप्रबोधन करून, सर्व समाजाला जागृत करणे, स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी सर्वांची एकजूट करणे, आजचे चित्र पहाता आपण स्वतंत्र असलो तरी, कोरोनाने आम्हाला आपल्या तंत्रात जखडून टाकले आहे आणि समाजाला उठा, जागे व्हा आणि विषाणूच्या विषवल्लीला आपल्या गल्लीबोळातून हाकलून लावा असे म्हणावे, तर आपण घरीच बंदिस्त आहोत. तरीही ज्याला जसे योग्य वाटेल त्या तंत्रा-मंत्राचा उपयोग करून, वाणीने, लेखणीने, प्रत्यक्ष कृती करून जनजागृती करणे आपल्याला नक्कीच शक्य आहे. त्यासाठी आपापसातील मतभेद विसरूया आणि एकजुटीने एकमताने, एकदिलाने त्या विघ्नहर्त्यास साकडे घालून म्हणूया, ‘‘हे हेरंबा, हे शिवपुत्रा, हे महानायका आम्हाला या संकटातून सहीसलामत मुक्त कर. तुझे आगमन झाल्यावर या विषाणूचे विसर्जन व्हावे, अशी किमया कर महाराजा!

...बाळ-गोपाळांना, अबाल-वृध्दांना, अस्तिक-नास्तिकांना तो गणेश सुखकर होवो! अशी प्रार्थना करून सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.

संबंधित बातम्या