कॉंग्रेस विधीमंडळ गटाचा पर्यावरणाचे जतन करण्याच्या आंदोलनास पाठिंबा

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

चलो राजभवन व रिवण येथे कॉंग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या किसान मेळाव्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल विधीमंडळ पक्षाने समाधान व्यक्त केले व सहभागी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. येत्या ८ नोव्हेंबर रोजी कॉंग्रेस पक्षातर्फे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

पणजी:  कॉंग्रेस विधीमंडळ गटाच्या आज झालेल्या बैठकीत पर्यावरण नष्ट करणारे रेल्वे दुपदरीकरण, राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण तसेच वीजवाहिनी टाकण्याच्या तीन प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली व मोले अभयारण्य तसेच भगवान महावीर अभयारण्यातून जाणाऱ्या या प्रकल्पांमुळे पर्यावरण, वन्यजीव तसेच गोव्याची अस्मिता यांचा नाश होणार असल्याने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गोव्यात चालू असलेल्या सर्व आंदोलनास संपूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात दिली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सेंट्रल एंपावर्ड समितीकडे मी ३१ जुलै रोजी एक निवेदन पाठवून मोले येथील प्रकल्पाने पर्यावरण, वन्यजीव तसेच गोव्याच्या अस्मितेला धोका निर्माण होणार असल्याचे कळविले होते व त्याची प्रत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर  याना पाठवली होती असे सांगून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्या मागील गोवा भेटीत आपणांकडे कोणतेच निवेदन आले नसल्याच्या केलेल्या वक्तव्याचा कॉंग्रेस विधीमंडळ पक्षाने निषेध केला, अशी माहिती दिगंबर कामत यांनी दिली. 
केंद्र सरकारने आणलेल्या किसान विरोधी कायद्यांवर विधीमंडळ पक्षाने चिंता व्यक्त  केली व कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या रक्षणासाठीचे आंदोलन गोव्यातही अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

चलो राजभवन व रिवण येथे कॉंग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या किसान मेळाव्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल विधीमंडळ पक्षाने समाधान व्यक्त केले व सहभागी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. येत्या ८ नोव्हेंबर रोजी कॉंग्रेस पक्षातर्फे ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

गोव्यातील कोविड महामारी तसेच वाढती गुन्हेगारी, खुन, महिलांची सुरक्षा, ड्रग्ज व्यवसाय यावरही आजच्या बैठकीत चर्चा करून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला तसेच ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त करुन सरकारला सतत जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोविड महामारीत लोकांना जीवनावश्यक वस्तू, औषधे, सॅनिटायझर, मास्क वितरीत करून मदत करणाऱ्या कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे विधीमंडळ पक्षाने अभिनंदन केले. 
लोकांना चांगली आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी वेळोवेळी आवाज उठविण्याचे आजच्या बैठकीत ठरविण्यात आले.

संबंधित बातम्या