आले गणराया...: बाप्पाच्या स्वागताच्या तयारीला वेग

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

सर्वांचा लाडका समजल्या जाणाऱ्या गणरायाची स्थापना करणाऱ्या जागेची सजावट करण्यात वेगळाच आनंद असतो. दरवर्षी येणारा हा उत्सव यंदा कोरोनामुळे मोठ्‍या उत्साहात साजरा केला जाणार नसला, तरी शक्य तेवढ्या प्रमाणात त्याच्यासाठी सजावट करणे गरजेचे आहे. सध्या सजावटीसाठी अजूनही साहित्याची जुळवाजुळव सुरू आहे. यावर्षी काही नियम पाळून उत्सव करावा लागणार आहे. मडकईकर कुटुंबाचा गणपती असल्याने प्रत्येकजण काहीना काही योगदान देत असतो. - दत्ता मडकईकर, भाटले

पणजी: सहा दिवसांवर विघ्नहर्त्या गणेशाचे आगमन येऊन ठेपले आहे. राज्य सरकारने घातलेल्या अटी आणि शर्तींमुळे गणेशोत्सवाच्या आयोजनावरही संकट ओढवले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक संकट ओढवलेले असताना त्यातही आपल्या लाडक्या गणराच्या आगमनाची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. शनिवारी, रविवारी सरकारी सुटी असल्याने नोकरदार वर्गाने गणरायाची स्थापना करण्याची जागा सजावट करण्यात घालविली.

गणशोत्सवावर यावर्षी कोरोनाचे संकट आहे. दुसरीकडे कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असल्या, तरी पहिल्यासारखा सजावटीवर खर्च न करता सध्या ऐपतीनुसार आणि आर्थिक बाजू सांभाळून गणरायाच्या आगमनाची तयारी भक्त करताना दिसत आहेत. याशिवाय गोव्यात कौटुंबिक गणपतीच्या स्थापन्याची तयारीही सुरू असल्याचे सध्या चित्र आहे. विशेष म्हणजे पणजीत राहणारे अनेकजण आपल्या मूळगावी गणपतीच्या सजावटीची तयारी करण्यासाठी गेले होते. 

बाजारात सजावटीच्या वस्तू विक्रीची मांडणी सुरू झालेली दिसून आली. उपरण्यापासून ते विविधरंगी फुलांच्या आर्टिफिशीयल माळा, विविध रंगांचे कागद, चकमक, रांगोळ्या अशा अनेकप्रकारच्या वस्तू बाजारात दुकानांतून मांडणी सुरू झाली आहे. याशिवाय चीनच्या वस्तूंची अजूनही बाजारात विक्री सुरू असून चायनासिरीज या इलेक्ट्रॉनिक दिव्यांच्या माळांना अजूनही मागणी असल्याचे दिसत आहे. एकंदर गणेशोत्सवाच्या वस्तूंमुळे बाजार सजू लागला आहे. दुसरीकडे अद्याप फटाक्यांची मांडणी दुकानदारांनी केली नसल्याचे चित्र असले तरी काहीप्रमाणात त्यांची खरेदी-विक्री होणार हे लक्षात घेऊन येत्या दोन-तीन दिवसांत फटाक्यांची मांडणी होऊ शकते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या