गोव्यात शिमगोत्सवाची दणक्यात तयारी; अशी असणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 18 मार्च 2021

फोंड्यातील सरकार पातळीवर होणारा शिमगोत्सव मंगळवारी 30 रोजी होणार असून म्हार्दोळच्या महालसा देवीला नमन शुक्रवारी 26 रोजी होणार आहे.

फोंडा: फोंड्यातील सरकार पातळीवर होणारा शिमगोत्सव मंगळवारी 30 रोजी होणार असून म्हार्दोळच्या महालसा देवीला नमन शुक्रवारी 26 रोजी होणार आहे. या शिमगोत्सवात चित्ररथ, रोमटामेळ, लोककला नृत्य तसेच वेशभूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री तथा फोंडा शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी 
दिली. 

फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात आज (बुधवारी) अंत्रुज शिमगोत्सव समिती व फोंडा शिमगोत्सव समितीच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत फोंड्यातील शिमगोत्सवासंबंधी चर्चा करून निर्णय घेण्यात आले. यावेळी निवडण्यात आलेल्या शिमगोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मंत्री गोविंद गावडे, आयोजन समितीचे कार्यकारी अध्यक्ष आमदार रवी नाईक, उपाध्यक्ष आमदार सुभाष शिरोडकर, आमदार सुदिन ढवळीकर तसेच सरचिटणीस नगराध्यक्ष विश्‍वनाथ दळवी, खजिनदार फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप नाईक तसेच समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या बैठकीला मंत्री गोविंद गावडे, आमदार रवी नाईक, नगराध्यक्ष विश्‍वनाथ दळवी, मुख्याधिकारी प्रदीप नाईक, अशोक नाईक, नगरसेवक शांताराम कोलवेकर, संदीप खांडेपारकर, हनुमंत नाईक आदी उपस्थित होते.

या शिमगोत्सव मिरवणुकीला तिस्क फोंडा येथून 30 मार्च रोजी संध्याकाळी चार वाजता सुरवात होणार आहे. तर 26 तारखेला नमन कार्यक्रमालाही संध्याकाळी चार वाजता प्रारंभ होणार आहे. 29 मार्चला संध्याकाळी सात वाजता ऑर्केस्ट्रा सादर करण्यात येईल. शिमगोत्सवात सहभागी चित्ररथांना अनुक्रमे 60 हजार, 50 हजार, 40 हजार तसेच अन्य बक्षिसे देण्यात येणार असून रोमटामेळ स्पर्धक पथकांना अनुक्रमे 35 हजार, 25 हजार व 15 हजार व अन्य बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय लोकनृत्य पथके, वेशभूषा स्पर्धकांनाही आकर्षक रोख पारितोषिके दिली जातील. या स्पर्धेत सहभागी चित्ररथांच्या लांबीची मर्यादा घालण्यात आली असून स्पर्धक पथकांनी आधी आयोजकांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

गोवा पर्यटनाला कोरोना काळातही ग्रीन सिग्नल 

पथकांच्या मानधनाची रक्कम वाढवा!

यंदा सरकार पातळीवरील शिमगोत्सव तीनच ठिकाणी आयोजित करण्यात आला असून चित्ररथ तसेच इतर स्पर्धक पथकांना खर्च भागणे मुश्‍किलीचे ठरणार आहे. त्यासाठी सरकारने सहभागी सर्वच पथकांच्या मानधनाची रक्कम वाढवून द्यावी, असे आवाहन फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी 
केले आहे. 

कोविडमुळे यंदा सर्वचबाबतीत निर्बंध आल्याने सरकारने यंदा तीनच ठिकाणी शिमगोत्सव आयोजित केला हे खरे आहे, तरीपण कलाकारांना नाउमेद करू नये, असेही रवी नाईक म्हणाले. दरम्यान, फोंड्यात काही कलाकारांनी एकत्र येऊन स्पर्धा घ्यायची असल्यास सगळीकडे घ्या, कारण पथकांचा खर्च भागणे मुश्‍किल होणार असल्याचे सांगितले होते, त्याअनुषंगाने आमदार रवी नाईक यांनी ही मागणी  केली आहे.

संबंधित बातम्या