गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष हेच घोटाळेबाज

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

गोमंतक भंडारी समाजाचे बेकायदेशीररित्या निवड झालेले अध्यक्ष अशोक नाईक हेच मुळात  मोठे घोटाळेबाज व खोटारडे असून यापूर्वी त्यांनी फोंडा येथे झालेल्या भंडारी समाजाच्या मेळाव्याच्या जेवणावर झालेल्या खर्चावरून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे आणि याचा हिशोब त्यांनी त्यावेळी सादर केला नाही. मुळात भंडारी समाजाच्या अध्यक्ष पदावर असलेले अशोक नाईक यांनी भंडारी समाजासाठी कोणते योगदान दिले ते त्यांनी जाहीर करावे.

पेडणे :   गोमंतक भंडारी समाजाचे बेकायदेशीररित्या निवड झालेले अध्यक्ष अशोक नाईक हेच मुळात  मोठे घोटाळेबाज व खोटारडे असून यापूर्वी त्यांनी फोंडा येथे झालेल्या भंडारी समाजाच्या मेळाव्याच्या जेवणावर झालेल्या खर्चावरून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे आणि याचा हिशोब त्यांनी त्यावेळी सादर केला नाही. मुळात भंडारी समाजाच्या अध्यक्ष पदावर असलेले अशोक नाईक यांनी भंडारी समाजासाठी कोणते योगदान दिले ते त्यांनी जाहीर करावे. संपूर्ण गोव्यातील तालुक्याच्या समित्या बांधण्याचे काम अशोक नाईक हे करण्यास अपयशी ठरलेले अध्यक्ष असून त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची जोरदार मागणी पेडणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भंडारी समाजाच्या बांधवांनी केली. 
   पेडणे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला पेडणे पालिकेचे माजी नगरसेवक व पेडणे तालुका भंडारी समाजाचे माजी उपाध्यक्ष प्रशांत गडेकर, माजी नगरसेवक दीपक मांद्रेकर, केंद्रीय भंडारी युवा कार्यकारिणी समितीचे सदस्य  रुद्रेश नागवेकर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत गडेकर म्हणाले की,संपूर्ण गोव्यात अनिल होबळे यांच्या अध्यक्षतेखाली  गोव्यात भंडारी समाजाची मोठी चळवळ व जागृती करत भंडारी समाजाला एकसंघ करण्याचे मोठे कार्य अनिल होबळे यांच्या अध्यक्षतेखाली दोन वर्षांपूर्वी झाले. मात्र दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत बेकायदेशीर निवडणूक प्रक्रिया हाताळत विद्यमान अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांनी झालेल्या मतदानापेक्षा ज्यादा बोगस नोंदणी करून आपली निवड करून घेतली. या प्रकाराची दाद अनिल होबळे यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे मागितली होती. फेरमतमोजणी मागून सुद्धा फेरमतमोजणी करण्यास मान्यता दिली नाही आणि असेच गैरप्रकार करून अध्यक्षपद भूषावणारे अशोक नाईक यांनी समाजाचे नेते अनिल होबळे यांच्यावर आरोप केल्यास आम्ही गप्प राहणार नाही,असा इशारा प्रशांत गडेकर यांनी दिला.
 माजी दिवंगत भंडारी समाज अध्यक्ष   मधू पोकू नाईक हे समाजाचे अध्यक्ष असताना सासष्टी तालुक्याचे अध्यक्षपद भूषवणारे अशोक नाईक यांनी जातीचे प्रमाणपत्र देऊन त्यावेळी लाखो रुपयांचा घोटाळा केला. त्यांनी त्याचा हिशेब दिला नाही. अशा मनुष्याला समाजाच्या नेत्यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे भंडारी युवा कार्यकारिणी सदस्य रुद्रेश नागवेकर यांनी  सांगितले.

अशोक नाईक यांनी अनिल होबळेवर आरोप करताना तारतम्य बाळगावं. नाईक यांनी समाजासाठी कोणते योगदान दिले हे त्यांनी तपासून पाहावे. पेडणे तालुक्याची भंडारी समाजाची समिती काढण्यास ते अपयशी ठरलेले आहेत. अशा माणसाने समाजासाठी मोठे योगदान दिलेल्या अनिल होबळेसारख्या व्यक्तीवर आरोप करू नयेत,असा सल्ला दिला. अशोक नाईक हे समाजामध्ये दुफळी माजवण्याचे काम करत असून समाजातील काही ठराविक माणसांनाच घेऊन अन्य समाज बांधवांवर आरोप करून त्यांना बदनाम करत आहेत. विद्यमान अध्यक्ष अशोक नाईक यांच्या डोळ्यात होबळेंची पदे खूपत असून वैफल्यग्रस्त होऊन नको ते आरोप श्री. होबळे यांच्यावर करत असल्याचे प्रशांत गडेकर म्हणाले.

संबंधित बातम्या