..आणि राष्ट्रपती कोविंद यांनी दिले वधु-वरांना आशीर्वाद

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 डिसेंबर 2020

राष्ट्रपती मंदिरात आल्यावर या मंदिरात लग्न लागत असल्याने प्रशासनाला तो पूर्वनियोजित सोहळा थांबवता आला नाही. राष्ट्रपतींनीही मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या सोहळ्याला हजेरी लावत या नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद दिले. यामुळे हे लग्न चांगलाच चर्चेचा विषय  ठरले आहे.  
 

पणजी- राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे शनिवारी गोवा मुक्ती दिनाच्या निमित्ताने गोव्यात आले होते. त्यांच्या दोन दिवसीय गोवा दौऱ्याच्या नियोजनात ऐनवेळी ठरलेल्या मर्दोली येथील महालसा नारायणी मंदिर दर्शनाच्या निर्णयामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. राष्ट्रपती मंदिरात आल्यावर या मंदिरात लग्न लागत असल्याने प्रशासनाला तो पूर्वनियोजित सोहळा थांबवता आला नाही. राष्ट्रपतींनीही मंदिरात दर्शन घेतल्यानंतर या सोहळ्याला हजेरी लावत या नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद दिले. यामुळे हे लग्न चांगलाच चर्चेचा विषय ठरले आहे. साडेचारशे वर्ष पोर्तुगीजांच्या राजवटीत राहिल्यानंतर १९ डिसेंबर १९६१ला गोवा मुक्त झाले. या घटनेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निमंत्रणामुळे गोव्यात आले होते. गोवा मुक्ती सोहळ्यात सहभाग घेण्याची संधी याआधी कोणत्याही राष्ट्रपतींना मिळाली नव्हती. यावर्षी साठावे वर्ष असल्याने राष्ट्रपतींना निमंत्रित करण्यात आल्याने पहिल्यांदाच या सोहळ्याला भारताच्या राष्ट्रपतींनी उपस्थिती लावली. ते या सोहळ्यासाठी दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. या सोहळ्याच्या दुसऱ्याच दिवशी कोविंद मुक्कामाला असलेल्या ठिकाणाहून अवघ्या १६ किमी दूर असलेल्या प्रसिद्ध महालसा मंदिरात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि प्रशासनाची एकच तारांबळ उडली.

राष्ट्रपती कोविंद यांच्या अचानक ठरलेल्या या नियोजनामुळे मंदिर प्रशासन आणि प्रशासनाची धावपळ सुरू झाली. कोविडमुळे लांबलेला लग्न सोहळा या मंदिरात पार पडत होता. राष्ट्रपतींच्या अचानत ठरलेल्या या दौऱ्यामुळे लग्न रद्द करावे लागते की काय, असा सवाल संबंधित कुटुंबियांच्या मनात आला. मात्र, राष्ट्रपती कोविंद यांनी आपल्या दौऱ्यामुळे लग्नावर कोणताही परिणाम होऊ नये याची काळजी घेत लग्न ठरलेल्या नियोजनानुसारच लागू दिले. यानंतर त्यांनी स्वत:च या लग्नाला उपस्थिती लावत नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद दिले. राष्ट्रपतींनी दाखवलेल्या या उदार भावामुळे त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रपतींनी यानंतर आपल्या ट्विटरवरून या लग्नाीची माहिती देताना लग्नाला उपस्थिती लावल्याचाा फोटोही शेअर केला. यावेळी त्यांच्याबरोबर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही उपस्थित होते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सुद्धा यावेळी या लग्नाना उपस्थित असल्याचे राष्ट्रपतींनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहेत.

संबंधित बातम्या