#GoaLiberationDay: स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवणाऱ्या गोमंतकीयांच्या पुर्वजांना मी नमन करतो- राष्ट्रपती

दैनिक गोमन्तक
शनिवार, 19 डिसेंबर 2020

लोहियांनी पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवणाऱ्या गोमंतकीयांच्या पुर्वजांना मी नमन करतो, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुक्तिसंग्रामातील सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

कांपाल- लोहियांनी पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवणाऱ्या गोमंतकीयांच्या पुर्वजांना मी नमन करतो, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुक्तिसंग्रामातील सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. गोवा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने येथील दयानंद बांदोडकर मैदानावर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. 

राष्ट्रपती कोविंद यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी डॉ. राम मनोहर लोहियांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत महात्मा गांधींच्याच शब्दांत लोहियांच्या कामगिरीचा आढावा घेतला. लोहिया यांना गोवा मुक्तीच्या आंदोलनात अटक झाल्यानंतर गांधींनी त्यांच्या कार्याचे कौतूक करत म्हटले होते की, 'माझ्या राजकारणाहून लोहियांचे राजकारण कदाचित भिन्न असेल. तरीही मी त्यांच्या गोवा जाण्याची आणि पोर्तुगीजांच्या राजवटीच्या काळ्या प्रकऱणांकडे लक्ष वेधण्याची प्रशंसा केली आहे. संपूर्ण भारत आपले स्वातंत्र्य परत घेत नाही तोपर्यंत गोव्याचे नागरिक आपल्या स्वातंत्र्याची वाट पाहू शकतात. मात्र, एखादा नागरिक आणि समाज आपली इभ्रत न गमावता व्यक्तिस्वातंत्र्याशिवाय राहू शकत नाही. डॉ लोहियांनी आंदोलनाची जी मशाल पेटवली आहे तिला गोव्याच्या लोकांनी जर विझवू दिली तर त्यात गोमंतकीयांचे नुकसानच आहे.' गांधींच्या या वाक्यांनुसार स्वातंत्र्याची ही मशाल तेवत ठेवणाऱ्या गोमंतकीयांच्या पुर्वजांना मी नमन करतो, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी म्हटले.
  
गोव्याच्या इतिहासावर एक कटाक्ष टाकत त्यांनी गोव्याच्या मुक्तीचा संघर्ष केवळ नागरिक स्वातंत्र्यासाठी नव्हता तर भारताबरोबर पुन्हा एकाकार होण्याचाही होता असे म्हटले. या मुक्ति संग्रामात महत्वाचे योगदान देणाऱ्या काही संघटनांच्या कार्याचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला. आझाद गोमन्तक दल, गोवा विमोचन समिती, गोवा मुक्ती सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख राष्ट्रपती कोविंद यांनी केला.  

 गत सरकारांनी केलेले काम अधोरेखीत करत राष्ट्रपतींनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचेही नाव घेतले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नावाचाही त्यांनी यावेळी विशेष उल्लेख केला. समान नागरिक संहितेचा अंगीकार कऱणाऱ्या गोव्याचे त्यांनी कौतूक केले. गोवा विकसित नव्हते. अनेक वर्षांच्या राजवटीनंतर गोवा हे पूर्णत: देशोधडीला लागलेले असताना गोव्याने तेथून सुरूवात करत आज प्रति व्यक्ति आवकच्या बाबतीत राज्य़ाचा देशात प्रथम क्रमांक लागतो असा संदर्भ देत त्यांनी राज्य़ाचे शाबासकी दिली. कोविडकाळात गोव्य़ातील औषध उत्पादन कंपन्यांनी चांगली कामगिरी केली असल्याचेही राष्ट्रपती यावेळी म्हणाले. शिक्षणातही राज्याने कौतूकास्पद कामगिरी केली असल्याचे सांगत त्यांनी येथील शैक्षणिक संस्थांच्य़ा कामगिरीकडे लक्ष वेधले. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमांतही गोवा राज्य पुढारेलेले असून 'इफ्फी' या फिल्म फेस्टीवलचाही उल्लेख करायला राष्ट्रपती कोविंद विसरले नाहीत.    
 
गोवा मुक्ति संग्रामाचे हे ६०वे वर्ष असल्याने पुढील वर्षभर गोव्याचा समृद्ध इतिहास सांगण्यासाठी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचे उद्धाटन तसेच मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विनंतीमुळे राष्ट्रपती आज गोव्यात आले होते.

संबंधित बातम्या