गोव्यातील विविधतेत एकता ; गोमंतकीयांच्या ऐक्याचे राष्ट्रपतींकडून कौतुक

गोम्तक वृत्तसेवा
रविवार, 20 डिसेंबर 2020

 डॉ. राम मनोहर लोहियांनी आंदोलनाची जी मशाल पेटवली आहे, ती गोव्याच्या लोकांनी जर विझू दिली, तर त्यात गोमंतकीयांचे नुकसानच आहे. स्वातंत्र्याची ही मशाल तेवत ठेवणाऱ्या गोमंतकीयांच्या पूर्वजांना मी नमन करतो, असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल केलं.

पणजी :  गोव्यात समान नागरी कायदा आहे. तो समाजमनाने स्वीकारला आहे. याचमुळे येथे विविधतेत एकता आहे. सांस्कृतिक विविधता एकत्र नांदत आहे. सामाजिक सलोखा आहे. हे सारे देशासाठी आदर्शवत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल केलं. डॉ. राम मनोहर लोहियांनी आंदोलनाची जी मशाल पेटवली आहे, ती गोव्याच्या लोकांनी जर विझू दिली, तर त्यात गोमंतकीयांचे नुकसानच आहे. स्वातंत्र्याची ही मशाल तेवत ठेवणाऱ्या गोमंतकीयांच्या पूर्वजांना मी नमन करतो, असेही त्यांनी नमूद केले.गोवा मुक्तिदिनाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाचे उद्‍घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते कांपाल येथील मैदानावर झाले. यावेळी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राजशिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत मंचावर होते. 

राष्ट्रपती कोविंद यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी डॉ. राम मनोहर लोहियांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत महात्मा गांधींच्याच शब्दांत लोहियांच्या कामगिरीचा आढावा घेतला. लोहिया यांना गोवा मुक्तीच्या आंदोलनात अटक झाल्यानंतर गांधींनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत म्हटले होते, की ''माझ्या राजकारणाहून लोहियांचे राजकारण कदाचित भिन्न असेल. तरीही मी त्यांच्या गोवा जाण्याची आणि पोर्तुगिजांच्या राजवटीच्या काळ्या प्रकरणांकडे लक्ष वेधण्याची प्रशंसा केली आहे. संपूर्ण भारत आपले स्वातंत्र्य परत घेत नाही तोपर्यंत गोव्याचे नागरिक आपल्या स्वातंत्र्याची वाट पाहू शकतात. मात्र, एखादा नागरिक आणि समाज आपली इभ्रत न गमावता व्यक्तिस्वातंत्र्याशिवाय राहू शकत नाही. गोव्याच्या इतिहासावर एक कटाक्ष टाकत त्यांनी गोव्याच्या मुक्तीचा संघर्ष केवळ नागरिक स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर भारताबरोबर पुन्हा एकाकार होण्याचाही होता असे म्हटले. या मुक्तिसंग्रामात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या काही संघटनांच्या कार्याचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला. आझाद गोमन्तक दल, गोवा विमोचन समिती, गोवा मुक्ती सेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख राष्ट्रपती कोविंद यांनी केला.  

गत सरकारांनी केलेले काम अधोरेखित करत राष्ट्रपतींनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचेही नाव घेतले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नावाचाही त्यांनी यावेळी विशेष उल्लेख केला. समान नागरिक संहितेचा अंगीकार करणाऱ्या गोव्याचे त्यांनी कौतुक केले. गोवा विकसित नव्हते. अनेक वर्षांच्या राजवटीनंतर गोवा हे पूर्णत: देशोधडीला लागलेले असताना गोव्याने तेथून सुरुवात करत आज प्रति व्यक्ती आवकच्या बाबतीत राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो, असा संदर्भ देत त्यांनी राज्याचे शाबासकी दिली. कोविडकाळात गोव्यातील औषध उत्पादन कंपन्यांनी चांगली कामगिरी केली असल्याचेही राष्ट्रपती यावेळी म्हणाले. शिक्षणातही राज्याने कौतुकास्पद कामगिरी केली असल्याचे सांगत त्यांनी येथील शैक्षणिक संस्थांच्या कामगिरीकडे लक्ष वेधले. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमांतही गोवा राज्य पुढारलेले असून ''इफ्फी'' या फिल्म फेस्टीवलचाही उल्लेख करायला राष्ट्रपती कोविंद विसरले नाहीत. सूत्रसंचालन डॉ. दयानंद राव व अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी केले.

 

नवगोमंतक साकारायचा आहे

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, नवगोमंतकाची मुर्हूतमेढ आज रोवली जात आहे. गोवा मुक्तीनंतर जन्माला आलेल्या पिढीचा मी प्रतिनिधी आहे. आधुनिक गोव्याच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. वसाहतवादाचे चटके भोगल्यानंतर देशाच्या स्वातंत्र्यानंतर १४ वर्षांनी मुक्त झालेल्या गोव्याच्या मुक्तीमुळे देशाचे स्वातंत्र्यही पूर्ण झाले होते. आम्हाला नवगोमंतक साकारायचा आहे. त्यात युवा पिढीच्या आशा आकांक्षाना स्थान असेल. ते म्हणाले, बाळा राया मापारी, जगन्नाथराव जोशी, त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा या सगळ्यांना नमन करतो. नवगोमंतक साकार करण्यासाठी पुढे सरसावलेल्या तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून मी बोलत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनाने पवित्र झालेली ही भूमी आहे.

 

 गोव्याचे अस्तित्व राखले

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, दिव्यत्वाची प्रचिती आणून देणारा हा प्रदेश आहे. मुक्तीनंतर गोवा अबाधित राखण्याची जबाबदारी गोमंतकीयांनी पेलली आहे. सरकारच्या निर्णयांना कडाडून विरोध करत गोव्याचे अस्तित्व राखले आहे. गोवा मुक्तीसाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना सुखाचे दिवस यावेत, यासाठी प्रयत्न करावे, असे सरकारचे कर्तव्य आहे, तसे ते जनतेचेही आहे. मुक्तीच्या खुणा असलेल्या जागा, स्मारके, पुतळे यांचा परिसर स्वच्छ ठेवण्याची कर्तव्यभावना असली पाहिजे. गोवा मुक्तीसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विदेशांचे दौरे केले आणि जनमत तयार केले. त्याचा उपयोग नंतर गोवा मुक्तीनंतर जगात अनुकूल प्रतिक्रिया उमटण्यासाठी झाला. ‘अजीब है, ये गोवा के लोग’ असे नेहरूंनी म्हटले होते खरे, पण गोवा हा गोमंतकीयांनीच राखून ठेवला, हेही तितकेच खरे आहे. 

 

सारे काम करूया!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, विद्यार्थी दशेत असताना गोवा मुक्ती संग्रामाबाबत ऐकत होतो, त्यावेळी कधी एकदा गोव्याला जातो असे वाटत होते. गोव्याच्या मुक्तीसाठी देशभरातून स्वातंत्र्यसैनिक येथे आले. त्यांचे स्वप्न अद्याप साकार करायचे आहे. मी भगवान शंकरांचे वास्तव्य असलेल्या कैलास परिसरातील आहे, तर गोव्यालगत शिवसागर आहे. सागरात विष्णूचा वास आहे, सोबत लक्ष्मीमाताही आहे. छोटा पण सुंदर असा हा प्रदेश आहे. भूतानचा आनंद निर्देशांक सर्वात जास्त आहे. गोवा या निर्देशांकात सर्वांना मागे टाकू शकेल. यासाठी या दिशेने जाण्यासाठी आपण सारे काम करूया.

 

वैद्यकीय पर्यटनाला वाव

मंत्री श्रीपाद नाईक यांनी हिंदीतून भाषण केले. ते म्हणाले, गोव्याला लागून वनौषधींनी संपन्न असा पश्चिम घाट आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांनी विकासाचा पाया घातला, तरी भाजपच्या सरकारांनी या विकासाला दिशा दिली. खाणकामामुळे राज्याचा आर्थिक विकास होत गेला. आता पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती होत आहे. या साऱ्यामुळे वैद्यकीय पर्यटनाला गोव्यात वाव आहे. येथे काही जणांना येणाऱ्या प्रकल्पांना विरोध करण्याची सवय जडली आहे. त्यांचे मतभेद असतील, पण विकासासाठी त्यांनी एकत्र आले पाहिजे. 

 

गोवा प्रगतशील राज्य

मंत्री गुदिन्हो म्हणाले, सरकार पायाभूत सुविधा विकासासोबत मनुष्यबळ विकासाकडेही लक्ष देत आहे. समाजातील काही घटक हे मोठ्या प्रकल्पांना विरोध करत आहेत. मात्र जनतेने विकासाच्या बाजूने मतदान करत उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपला यश मिळवून दिले आहे. देशातील सर्वात प्रगतशील राज्य म्हणून गोव्‍याची गणना होते, त्याचसोबत गोव्यातील निसर्गसंपदेवर जग फिदा असून जगभरातील पर्यटक एकदाच नव्हे, वारंवार गोव्यात त्याचमुळे येतात. 

 

अधिक वाचा :

गोवा मुक्तिदिन सोहळ्याच्यावेळी  ७ पोलिस व ३ अग्निशमन जवानांना मुख्यमंत्री सुवर्णपदक प्रदान

आडपईत साकारली गोवा मुक्तिपर्वाची कलाकृती!

गोवा मुक्तिदिन सोहळ्याचं स्वातंत्र्यसैनिकांना आमंत्रण नाही 

 

संबंधित बातम्या