"राष्ट्रपतींनी गोवा सरकारच्या निमंत्रणाला नकार देऊन दौरा टाळावा"

दैनिक गोमन्तक
बुधवार, 16 डिसेंबर 2020

कोविड महामारीमुळे राज्याला मिळणाऱ्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे.

पणजी: कोविड महामारीमुळे राज्याला मिळणाऱ्या महसुलात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने सरकारची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत सरकार गोवा मुक्तिदिन षष्ठ्यब्दी सोहळ्यासाठी सुमारे १०० कोटींचा अनाठायी खर्च करत आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी गोवा सरकारचे निमंत्रणाला नकार देऊन दौरा टाळावा अशी विनंती करणारे पत्र गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवले आहे. 

राष्ट्रपतींना या सोहळ्यासाठी आमंत्रण देऊन सुमारे १०० कोटी रुपयांचा खर्च कार्यक्रमासाठी करत आहे. त्यामुळे त्यांनी दौऱ्यासंदर्भात विचार करून योग्य निर्णय घ्यावा. राज्यात कोविड संसर्गाचा धोका आहे. या महामारीमुळे अनेकजण बेरोजगार झालेले आहेत तसेच हे सरकार गोमंतकियांना न्याय देऊ शकलेले नाही. अनेक गोमंतकिय उदारनिर्वाहासाठी कठीण परिस्थितीतून जात आहे अशा परिस्थितीत सरकार राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर अनाठायी खर्च करत आहे तो टाळणे शक्य आहे. राज्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत मात्र त्यावर तोडगा काढण्याऐवजी राज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. 

कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास राजी नाहीत. गेल्या काही दिवसांत शिक्षक व विद्यार्थ्यांना संसर्ग झाला आहे. राज्य सरकारची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे त्यामुळे योजनांचे आर्थिक साहाय्य वेळेवर देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातील खाण व्यवसाय तसेच पर्यटन व्यवसायातून पुरेसा महसूल सरकारला मिळत नाहीत. बेरोजगार झालेल्यांनी सरकारकडून आर्थिक सहाय्याची अपेक्षा केली आहे मात्र त्यांना ती मिळालेली नाही. 

राज्यातील पर्यावरण विध्वंसक प्रकल्पांना लोकांचा विरोध झिडकारून सरकार प्रकल्प पुढे नेत आहे. गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने येथील संस्कृती, वारसा, नैसर्गिक सौंदर्यीकरण व स्रोतासाठी जगात प्रसिद्ध आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना बंदी नाही मात्र गोवा मुक्तिदिन षष्ट्यब्दी सोहळ्यासाठी १०० कोटींच्या खर्चाला विरोध आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी गोवा सरकारने दिलेल्या निमंत्रणाला नकार द्यावा अशी विनंती सरदेसाई यांनी पत्रात केली आहे.

आणखी वाचा:

राष्ट्रपतींच्या गोवा दौऱ्यानिमित्त पोलिसांनी घेतली सुरक्षा व्यवस्थेची बैठक -

संबंधित बातम्या