गणपती संपताच चिकन, मासे खरेदीसाठी खव्वयांची तुफान गर्दी

गणपती संपताच चिकन, मासे खरेदीसाठी खव्वयांची तुफान गर्दी
Price hike in fish market at Dicholi; demand for broiler chicken

डिचोली: श्रावण मास, चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी साजरी झाल्याने मत्स्यखवय्यांची पावले आता मासळी मार्केटात वळू लागली आहेत. तुटवड्यामुळे मासळी महाग असली, तरी अपेक्षेप्रमाणे आज बुधवारी डिचोलीत मासळी खरेदीला जोर आला होता. 

श्रावण महिन्यापासून "शिवराक" पाळलेल्या मत्स्यप्रेमींनी आज बुधवारी अपेक्षेप्रमाणे डिचोली मासळी बाजारासह डिचोली-साखळी रस्त्यावरील कारापूर-तिस्क येथे मासळी खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून येत होते. कारापूर-तिस्क येथे कायमस्वरुपी मासळी मार्केट नसले, तरी काही मासळी विक्रेते त्याठिकाणी बसतात. ताजी आणि वेगवेगळ्या प्रकारची मासळी मिळत असल्याने बहूतेक खवय्ये कारापूर-तिस्क येथे जाणे पसंद करतात. 

मागील आठवड्यात पाच दिवसांची चतुर्थी साजरी झाल्यानंतर हळूहळू मासळी बाजारात मत्स्यखवय्यांची पावले वळत होती. मात्र, मासळीचा तुटवडा जाणवत होता. काल अनंत चतुर्दशी साजरी झाल्याने आज बुधवारी मासळी मार्केटात ग्राहकांची वर्दळ वाढली होती. मागील आठवड्याच्या तुलनेत बुधवारी डिचोलीसह कारापूर-तिस्क येथे  मासळीची आवकही काहीसी वाढली होती. 

आज बुधवार असल्याने डिचोलीत मासळी खरेदीसाठी खवय्यांची गर्दी उडणार हे साहजिकच होते. आज बाजारात मासळीही महाग.होती. बांगडे आकाराप्रमाणे २०० रुपयांना ३ ते ४ नग, वेर्ल्या २०० रु. वाटा, पापलेट, कोळंबी ४०० ते ५०० रु. किलो, तर सुरमई ८०० रु. किलो याप्रमाणे विकण्यात येत होती. मासळी महाग असल्याने काहींनी चिकन खरेदी करणे पसंद केले. त्यामुळे डिचोली बाजारात बॉयलर चिकनलाही मागणी वाढली होती.

संपादन: ओंकार जोशी

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com