काजू बियांच्या दरात मोठी घसरण

Dainik Gomantak
गुरुवार, 28 मे 2020

दर आला ९० रुपये किलोवर, काजू बिया निवडून खरेदी

पेडणे

काजू बिया दरात मोठी घसरण झाली असून हा दर ९० रुपये किलोवर आलेला आहे. या आठवड्यात एका किलो मागे १५ रुपये कमी झालेला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत काजू बियांचा दर १०५ रुपये किलो होता. एका बाजूने अगोदरच यंदा काजू उत्पादनाला बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने काजूचे यंदा चांगले उत्पन्न आले नव्हते. १९ मार्चपर्यंत १२३ रुपये किलो असा काजू बियांचा दर होता. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ता.२० मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर टाळेबंदी जाहीर झाल्यावर काजू बिया खरेदीसाठी दुकान उघडे नव्हते किंवा कुणी काजू खरेदी व्यापारी संस्था नव्हती. यामुळे काजू बागायतदार व याच व्यवसायावर अवलंबून असलेले व्यावसायिकांवर बिकट परिस्थिती आली होती. त्यानंतर सरकारच्या प्रयत्नानंतर व गोवा बागायतदार संघातर्फे १०५ रुपये किलो या दराने काजू बिया खरेदी करण्यास सुरवात केल्याने काजू उत्पादकांना दिलासा मिळाला होता. मात्र, एका शेतकऱ्याकडून फक्त शंभर किलो काजू बिया घेतल्या जायाच्या. या अशा अटीमुळे जास्त उत्पन्न घेणाऱ्या काजू बागायतदारांची मात्र, कुचंबणा झाली. त्यानंतर आता काजू बियांचा दर कमी झाल्यावर गोवा बागायतदारात काजू बिया खरेदी करताना काजू बिया निवडून काढल्या जात आहेत. अगोदरच यंदा काजूचे उत्पन्न कमी त्यातच काजू बियांचा दर किलो मागे १५ रुपये कमी झाला आहे आणि अशा परिस्थितीत काजू बिया खरेदी करताना त्या सरसकट न खरेदी करता काजू बिया निवडून काढत असल्याने आम्हा काजू बागायतदारांच्या नुकसानीत आणखीन भर पडत आहे अशा काजू उत्पादकाकडून प्रतिक्रिया ऐकू येत आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर काजुबियांच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

 

संबंधित बातम्या