जनतेचे मनोधैर्य खच्ची करू नका!

दैनिक गोमंतक
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

सक्षम व्यवस्था सुसज्ज ठेवणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. ती बाजूला ठेवून लॉकडाउन आणावा लागेल, निर्बंध लादावे लागतील अशा विधानांनी कोरोना नव्हे; नागरिकांचे मनोधैर्य खच्ची होईल, याचे भान सरकारने ठेवायला हवे.

कोरोनाच्या नव्या लाटेची चर्चा सुरू आहे. अशा किती लाटा आहेत, याबद्दलची माहिती कोणालाच नाही. कोविडच्या विषाणूवर अजूनही संशोधन सुरू आहे आणि लस शोधल्याचा दावाही अधूनमधून होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतरावरून व्यवहार करणे, असे मार्ग सारेच वापरत आहेत. अर्थव्यवस्था खड्ड्यात ढकलणारा आणि लाखोंना बेरोजगार करणारा लॉकडाउनसारखा प्रयोगही करून झाला आहे.

ही झाली पार्श्वभूमी, जी गोंधळाची आणि अस्वस्थ करणारी आहे. ही अस्वस्थता कमी करणे, भीती पसरू न देणे आणि त्यासाठी उपाययोजना करणे हे सरकार नावाच्या व्यवस्थेचे काम आहे. नेमक्‍या याच क्षणी महाराष्ट्रातील शासन आणि प्रशासन संदिग्ध विधाने करून लोकांमध्ये लॉकडाउनची भीती निर्माण करते आहे. गोव्याला यापुढे लॉकडाउन परवडणारे नाही. लॉकडाउनसारखा सारी सूत्रे बाबूशाहीच्या हाती सोपवून देण्याचा आततायीपणा लोकनियुक्त शासनाने करता कामा नये.

त्याचे विपरित परिणाम दीर्घकाळ महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला आणि पर्यायाने समाजाला भोगावे लागतील. विषाणूच्या संसर्गामुळे नागरिकांना वैद्यकीय सेवेची तातडीची गरज लागू शकते. त्यासाठीची सक्षम व्यवस्था सुसज्ज ठेवणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. ती बाजूला ठेवून लॉकडाउन आणावा लागेल, निर्बंध लादावे लागतील अशा विधानांनी कोरोना नव्हे; नागरिकांचे मनोधैर्य खच्ची होईल, याचे भान सरकारने ठेवायला हवे.

संबंधित बातम्या