कैद्यांना धमखावणाऱ्या व्हिडिओची कारागृह अधीक्षकांकडून चौकशी; जेलरसह सहा तुरुंग कर्मचारी अडचणीत

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील संशयित अन्वर शेख ऊर्फ टायगर हा एखाद्या फिल्मी स्टाईलप्रमाणे कारागृहात इतर कैद्यांना आपल्या दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत दिसत होते. व्हिडिओ कारागृहात काढण्यात आल्याने तेथील सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.

पणजी: कोलवाळ कारागृहात एखाद्या ‘फिल्मीस्टाईल’प्रमाणे गुन्हेगारांचा एक गट फेरफटका मारताना तसेच कैद्यांना दरारा दाखविणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची चौकशी कारागृह अधीक्षकांनी पूर्ण केली आहे. या चौकशीअंती एका जेलरसह सहाजण जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून स्पष्टीकरण देण्यासाठी आठवड्याची मुदत देण्यात आल्याची माहिती तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील संशयित अन्वर शेख ऊर्फ टायगर हा एखाद्या फिल्मी स्टाईलप्रमाणे कारागृहात इतर कैद्यांना आपल्या दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत दिसत होते. व्हिडिओ कारागृहात काढण्यात आल्याने तेथील सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. या व्हिडिओची दखल घेऊन व्हिडिओमधील तिघा गुन्हेगारांची तसेच कारागृहातील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या जबान्या नोंद करण्यात आल्या आहेत. हा व्हिडिओ ज्या दिवशी कारागृहात काढण्यात आला आहे त्या दिवशी ड्युटीवर असलेल्यांची चौकशी अधिकाऱ्यांनी जबान्या नोंदविल्यानंतर या सहा कर्मचाऱ्यांची नावे उघड झाली आहेत. या सर्वांना कारणे दाखवा नोटीस दिली असून त्यांना आठवडाभरात उत्तर देण्यास मुदत दिली आहे. या चौकशीत हा व्हिडिओ कोणी तसेच कोणत्या दिवशी काढण्यात आला आहे, हे चौकशीतून निषन्न झाले आहे. त्यानी नोटिशीला दिलेल्या उत्तरानंतर त्याना सुनावणी दिली जाईल. त्यानंतर दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल असे या अधिकाऱ्याने सांगितले. 

कोलवाळ कारागृहात काही अधिकाऱ्यांनाच मोबाईलचा वापर करण्यास मुभा आहे. मात्र ज्या मोबाईलने हे व्हिडिओ काढण्यात आले आहेत त्यातील काही तुरुंग कर्मचारीच आहेत. काही तुरुंग रक्षकच परवानगी नसताना मोबाईल घेऊन कारागृहात जातात व तेथील एका अधिकाऱ्याचा या तुरुंग रक्षकांना आशीर्वाद आहे. या त्यांच्या मोबाईलचा वापर काही गुन्हेगार करतात त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणाच खिळखिळी झाली आहे. या कारागृहात सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते मात्र त्यातील काही नादुरुस्त झाले आहेत तर काही कारागृहात होणाऱ्या हाणामारीच्यावेळी फोडण्यात आले आहेत. कारागृहातील कैदी व तुरुंग रक्षकांचे लागेबांधे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार कोलवाळ कारागृहात ३० सेकंद व २० सेकंदाचे दोन वेगवेगळे व्हिडिओचे चित्रीकरण करण्यात आले आहेत व गुन्हेगार अन्वर शेख हा जामिनावर कारागृहातून बाहेर आल्यानंतर ते व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आले होते. या व्हिडिओमध्ये मराठी गाणे वाजवण्यात आहे. संशयित शेख याला बलात्काराच्या प्रकरणात अटक झाली होती व त्याची रवानगी कोलवाळ कारागृहात करण्यात आली होती. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या