पलायन केलेला कैदी अजूनही गायब

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

कारागृह प्रशासनाची चौकशी सुरू, किनारपट्टी भागात शोध

पणजी: कोलवाळ कारागृहातून पसार झालेला अंमलीपदार्थप्रकरणातील कैदी हेमराज भारद्वाज याचा आजही थांगपत्ता लागला नाही. त्याने पूर्वनियोजित कट करूनच हे पलायन केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. 

याप्रकरणी कारागृहाच्या प्रशासनामार्फत चौकशी सुरू झाली असून त्याच्यासोबत कारागृहाच्या खोलीत असलेल्या इतर कैद्यांच्या जबान्या घेण्यात आल्या आहेत. किनारपट्टी भागात त्याचा शोध घेतला जात आहे. 

कैदी हेमराज भारद्वाज याने पलायन केल्यानंतर त्याच्या पाठलाग काही तुरुंगरक्षक तसेच पोलिसांनी केला होता. मात्र, तो त्यांना चुकवून रस्त्याच्या दिशेने पळाला व गायब झाला. त्यामुळे पलायन केल्यानंतर त्याला मदत करण्यासाठी कोणीतरी वाहन घेऊन रस्त्यावर वाट पाहत थांबला असण्याची शक्यता आहे. त्याने पलायन केल्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला बिनतारी संदेश पाठवून राज्याच्या हद्दीवर त्याची छायाचित्रेही पाठविण्यात आली होती. त्यामुळे गोव्यातच असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शिक्षा भोगत असलेल्या आरोपींचा कारागृहातील कामासाठी वापर केला जातो. त्यांना कारागृहाबाहेरही कामासाठी नेण्यात येते,  मात्र कच्च्या कैद्यांना कामासाठी कारागृहाबाहेर नेता येत नाही. 

या कैद्यांना कारागृहाबाहेर उभ्या असलेल्या म्हापसा पालिकेच्या वाहनामध्ये कचरा टाकण्याचे काम कोणी दिले होते याची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे याप्रकरणी कारागृहातील जेलर अडचणीत येऊ शकतो. कैदी पळाल्याने निषकाळजीपणचा ठपका तुरुंग रक्षक प्रकाश नाईक याच्यावर ठेवून त्याला निलंबित करण्याबरोबरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दरम्यान, शेजारील राज्याच्या पोलिसांनाही कैदी हेमराज भारद्वाज याच्या पलायनाची माहिती बिनतारी संदेशाद्वारे देण्यात आली आहे. मात्र, आज संध्याकाळपर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता. 

कारागृहातील काही कैद्यांशी तुरुंग रक्षकांचे साटेलोटे असल्याने हे कैदी या सुरक्षा रक्षकांनाही घाबरत नाहीत. त्यामुळे हेमराज हा तुरुंग रक्षकाची नजर चुकवून पळाला की त्याला पलायन करण्यासाठी जाणुनबुजून कचरा टाकण्यासाठी कारागृहाबाहेर आणले गेले होते, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या