आता कैदीही बनणार आत्मनिर्भर..!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील कैदी शिक्षा भोगून बाहेर तुरुंगाबाहेर आल्यानंतरही त्यांच्यावर असलेला आरोपीचा ठपका लगेच पुसला जात नाही. त्यांना नोकरी मिळणेही अवघड बनते. 

पणजी : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील कैदी शिक्षा भोगून बाहेर तुरुंगाबाहेर आल्यानंतरही त्यांच्यावर असलेला आरोपीचा ठपका लगेच पुसला जात नाही. त्यांना नोकरी मिळणेही अवघड बनते. अशावेळी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे कला नसते. त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना आवड असलेल्या क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविण्यासाठी कारागृहाच्या प्रशासनाने सरकारला प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे लवकरच या कैद्यांना आत्मनिर्भरतेचे धडे दिले जाणार आहेत. 

सध्या तुरुंगात केक व बिस्किटे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येऊन या कैद्यांच्या हातांना काम दिले आहे. या कामामुळे त्यांना कामाचा मोबदला दिला जातो. जे कुशल कैदी आहेत त्यांना प्रतिदिन ८० रुपये, निम्न कुशल कैदी यांना ६० रुपये तर अकुशल कैद्यांना ५० रुपये दर निश्‍चित करण्यात आला आहे. याशिवाय या कारागृहात लाकडी काम, शिलाई वर्ग, बेकरी, कृषी, प्लंबिंग, पेंटिंग तसेच उद्यानाची कामे कैद्यांना दिली जातात. कागदाच्या पिशव्या बनविणे, मेणबत्त्या बनविणे, बुक बाईंडिंग इत्यादी प्रशिक्षणही दिले जाते. या कारागृहात चांगले चित्रकार तसेच कलाकारही आहे. दरवर्षी दीपावलीनिमित्त कैद्यांकडून आकाशकंदील तसेच नाताळ उत्सवात चांदण्या (स्टार्स) बनविण्यात येतात. हे बनविलेले आकाशकंदील तसेच चांदण्या (स्टार्स) सरकारी खात्यातील कर्मचारी खरेदी करतात. तसेच हा माल प्रमुख शहरांमध्ये खासगी दुकानदारांनाही विक्रीसाठी उपलब्‍ध करून दिले जातात. यातून कैद्यांना चांगला मोबदलाही मिळतो व त्यामुळे त्यांना प्रोत्साहनही मिळते. 

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहाचे उद्‍घाटन झाले तेव्हा हे कारागृह नसून सुधारगृह असल्याची घोषणा तत्कालिन मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, त्यानंतर ही घोषणा मात्र हवेतच होती. तुरुंगाच्‍या आवारात फलोत्‍पादन या कारागृहाच्या आवारात मोठ्या प्रमाणात जागा आहे. त्यामुळे या ठिकाणी फलोत्पादन व्यवसाय सुरू करण्याबाबतही विचार आहे. या जागेत विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यासाठी कैद्यांचा वापर करणे शक्य आहे. त्यामुळे या कैद्यांचे मनही कामामध्ये व्यस्त राहू शकते तसेच त्यांच्या हातांनाही काम मिळणार आहे. यासंदर्भातची माहिती देण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कृषी खात्याचे अधिकाऱ्यांनाही आणणे शक्य आहे. कारागृहातील महिलांना लोणचे व पापड यासारखे व्यवसाय स्वयंसहाय्य गटाच्या धर्तीवर सुरू करण्यात येणार आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचा माल मार्केटमध्ये विकला जाईल याकडे लक्ष दिले जाणार 
आहे. 

कैद्यांना देणार आवडीनुसार प्रशिक्षण
कारागृहात सुमारे ५४२ कैदी आहेत त्यातील १४६ जण शिक्षा भोगत आहेत त्यात १३६ पुरुष, तर १० महिला आहेत. ३९६ कच्चे कैदी आहेत, त्यामध्ये ३७३ पुरुष व २३ महिला आहेत. जे कैदी शिक्षा भोगत आहेत त्यांना कारागृहातील विविध कामासाठी त्यांच्या वागणुकीनुसार निवडले जाते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या खर्चापुरते महिन्याला काही रक्कम मिळते. मात्र शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा ते गुन्हेगारीकडे वळू नयेत, यासाठी त्यांना विविध प्रशिक्षण त्यांच्या आवडीनुसार देण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. या प्रशिक्षणासाठी अनुभवी व्यक्तींमार्फत हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमासंदर्भातची माहिती कारागृहाच्या व्यवस्थापनाने सरकारला प्रस्ताव पाठवून पाठविली आहे. हे कैदी शिक्षा भोगून बाहेर आल्यावर त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास होऊ शकतो व त्यासाठी नोकरीच्या प्रतीक्षेची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, असे मत एका कारागृह अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 
 

संबंधित बातम्या