कारागृहातील निकृष्ट आहारावर कैद्यांचा बहिष्कार

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे कुटुंबियांना भेटण्यास निर्बंध, उद्रेक होण्याची शक्यता

उपोषणातील कैदी बेशुद्ध, इस्पितळात दाखल कच्च्या कैद्यांनी गेल्या दोन दिवसांपासून कारागृहातून मुक्त करण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणकर्त्यांमधील एका कैद्याला भोवळ येऊन तो बेशुद्ध पडला. त्यामुळे कारागृहातील अधिकाऱ्यांना कैद्यांनी धारेवर धरले. बेशुद्ध पडलेल्या त्या कैद्याला त्वरित म्हापसा येथील आझिलो इस्पितळात नेण्यात आले आहे. या कारागृहात अतिरिक्त महानिरीक्षकांनी भेट देण्यास नकार दिल्याने हे कच्चे कैदी आक्रमक बनले आहेत.

पणजी: कोलवाळ कारागृहातील निकृष्ट दर्जाचा आहार तसेच कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन दिवसांपासून कच्च्या कैद्यांनी आंदोलन सुरू करून आहार घेण्यावर बहिष्कार टाकला आहे. कोरोनाचा फैलाव वाढण्यापूर्वी त्यांची अंतरिम जामिनावर सुटका करण्याची मागणी ते करत आहेत. आज कैद्यांच्या कुटुंबियांना भेटण्याचा दिवस असतानाही ‘कोरोना’मुळे प्रशासनाने त्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कारागृहात कैद्यांचा उद्रेक होण्याची स्थिती उद्‍भवली आहे. 

कारागृहातील निकृष्ट दर्जाचा आहार दिला जात असल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी कैद्यांनी केलेल्या उपोषणामुळे उजेडात आले होते. त्यावेळी प्रशासनाने काही दिवस योग्य व्यवस्था केली. कारागृहात जेवणासाठी लागणाऱ्या सामानाच्या पुरवठ्याबाबत गैरकारभार होत असल्याचा संशय कारागृहाच्या अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त करून कमी सामानाचा पुरवठा केला जात आहे. मात्र, या अधिकाऱ्यांच्या वादाचा फटका कैद्यांना सोसावा लागत आहे. मुख्य स्वयंपाकी कच्चे कैदी हे कोरोनाबाधित झाल्याने जेवण करण्यास पर्यायी व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. जे जेवण कैद्यांना दिले जाते, त्यामध्ये फक्त कच्चा भात व पातळ आमटी असते. त्यामुळे हे जेवण गेल्या दोन दिवसांपासून घेणे कच्च्या कैद्यांनी बंद केले आहे. कोरोनाबाधित कैद्यांना ठेवण्यासाठी वेगळा कक्ष आरक्षित केला असला तरी त्याच्यावर या तुरुंगाच्या सहाय्यक अधीक्षकाचे नियंत्रण नाही. कैद्यांनी अनेकवेळा या अधीक्षकांसमोर समस्या मांडल्या तरी ते त्या सोडविण्याकडे दाद देत नाहीत. उलट या कैद्यांना अधिकाऱ्यांकडूनच धमक्या दिल्या जातात. त्यांच्या तक्रारी नोंद केल्या जात नाहीत. या अधिकाऱ्याने कारागृहातील ज्येष्ठ सहाय्यक अधीक्षकाविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कान फुंकून त्याचा पत्ता कट केला आहे. त्यामुळे या सहाय्यक अधीक्षकाला पणजीतील कारागृह खात्याच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या लोकांची थर्मल गनने तपासणीचे काम देण्यात आले आहे. एखाद्या शिपायाचे काम या अधिकाऱ्याला देऊन त्याला अपमानीत केले जात आहे. 

कारागृहातील सहाय्यक अधीक्षक हरिजन व भानुदास पेडणेकर यांचे पद एकच असले तरी हरिजन हे ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांचा कारागृहातून काटा काढून या कोलवाळ कारागृहावर पेडणेकर यांनी आपली पकड बसविली आहे. या कारागृहात सामानाचा गैरकारभार होत असल्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संशय आहे. मात्र, अजूनही त्यासंदर्भात चौकशी करण्यात आलेली नाही. सामान पुरवठ्याचा सर्व व्यवहार कारागृहातीलच प्रशासकीय कर्मचारी तसेच सहाय्यक अधीक्षक हाताळत असतात. त्यामुळे ही चौकशी केल्यास कारागृहातील काही कर्मचारीच अडकतील यासाठी ही चौकशी होऊ नये म्हणून सारवासारव केली जात आहे. 

दरम्यान, काँग्रेसने आज तुरुंग अतिरिक्त महानिरीक्षक आशुतोष आपटे यांची भेट घेऊन कारागृहातील कैद्यांना दिले जाणारे निकृष्ट दर्जाचे जेवण तसेच कोरोना संसर्ग अधिक फैलावू नये याकडे करण्यात आलेले दुर्लक्ष याचा जाब विचारला. या प्रकरणाची चौकशीची मागणी यावेळी काँग्रेसने केली. कोलवाळ कारागृहातील सामान पुरवठ्याची चौकशी केली जाईल. यासंदर्भातचा अहवाल मागवून त्यात गुंतलेल्यांविरुद्ध कारवाई केली जाईल असे आश्‍वासन दिल्याची माहिती काँग्रेसचे नेते वरद म्हार्दोळकर यांनी सोशल मीडियाला दिली. कैदी हे अपराधी असले तरी ते मनुष्य आहेत व त्यांना खाण्यायोग्य जेवण देणे तसेच त्यांच्या आरोग्याची निगा घेणे हे कारागृहाच्या प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, हे कर्तव्य बजावण्यास अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने मानवी हक्क आयोगाकडेही याची फिर्याद दाखल केली जाईल, असे म्हार्दोळकर म्हणाले. 

संबंधित बातम्या