प्रवाशांअभावी खासगी बस व्यवसाय अडचणीत 

dainik gomantak
मंगळवार, 2 जून 2020

सध्या ३५० बसेस सुरू झाल्या आहेत. या बसेसमधून सामाजिक अंतर ठेवून फक्त ५० टक्के प्रवासी घेऊन हा व्यवसाय चालविणे शक्य नाही, तरीही काही बस मालकांनी ही सेवा सुरू केली आहे.

पणजी

राज्यात कदंब तसेच खासगी बससेवा सुरू झाली आहे मात्र खासगी बससेवा आवश्‍यक प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याने ती सुरळीत करण्यात अडथळे येत आहेत. सध्या राज्यात सुमारे साडेतिनशेच खासगी बससेवा सुरू आहे. राज्यातील परप्रांतीय प्रवासी या खासगी बसगाड्यांमधून प्रवास करत होते मात्र ते आपल्या मूळ गावी परतत असल्याने त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने हा खासगी बससेवा व्यवसाय अडचणीत आला आहे. 
अखिल गोवा खासगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांना खासगी बससेवेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, राज्यात सुमारे दीड हजार खासगी बसेस शहरी तसेच ग्रामीण भागातून धावतात त्यापैकी फक्त सध्या ३५० बसेस सुरू झाल्या आहेत. या बसेसमधून सामाजिक अंतर ठेवून फक्त ५० टक्के प्रवासी घेऊन हा व्यवसाय चालविणे शक्य नाही, तरीही काही बस मालकांनी ही सेवा सुरू केली आहे. अनेकांनी कर्जे काढून बसेस विकत घेतलेल्या आहेत. बसेसचा विमा तसेच परमिट नुतनीकरण इत्यादीमुळे बसगाड्या बंद ठेवणेही परवडण्यासारखे नाही. टाळेबंदीत निम्मे प्रवासी बसमध्ये घेऊन सुरू करण्यास परवानगी असली तरी तेवढेही प्रवासी मिळत नाहीत अशी शोकांतिका आहे. त्यामुळे अर्ध्याहून अधिक बस मालकांनी हा व्यवसायच बंद ठेवला आहे. काही बस मालकांनी सरकारला त्यांच्या बसेस घेऊन चालविण्याची विनंती केली आहे. यावरून हा खासगी बस व्यवसाय काहींना सुरू ठेवणे अशक्यप्राय झाले असल्याचे यावरून दिसून येत आहे. 
राज्य सरकारने कंदब वाहतूक महामंडळातर्फे कर्मचाऱ्यांना प्रवासी पासेस सुरू केल्यानंतर खासगी बस मालकांना त्याच्या बदल्यात किलोमीटर नुसार अनुदान देण्याची आश्‍वासने देऊन आशेवर ठेवले होते. चार वर्षे उलटून गेले तरी अजूनही हे अनुदान अनेक बस मालकांना मिळालेले नाही. हे अनुदान देण्यासाठी वाहतूक खात्याकडे अनेकवेळा व्यवहार करण्यात आले तरी त्याची दखल घेतली जात नाही. खासगी बस मालकांना खात्याकडून काटेकोरपणे मापदंड लावले जातात मात्र त्याच्या बदल्यात खात्याकडून येणे असलेले अनुदान देण्याबाबत कोणतीच पावले उचलली जात नाहीत. वाहनांचे सुटे भाग तसेच टायरच्या किंमती वाढलेल्या आहेत त्यामुळे हा व्यवसाय चालविणे अशक्य झाला आहे असे ताम्हणकर म्हणाले. 
राज्यातील अनेक आस्थापने अजूनही या टाळेबंदीमुळे सुरू झालेली नाही. अनेक व्यवसाय बंद झाले आहेत त्यामुळे तेथे काम करणारे मजूर हे परप्रांतीय होते ते गावाकडे परतत आहेत. मजूर हे ग्रामीण भागात राहत असल्याने व खासगी बससेवा त्या भागातून धावत असल्याने अधिक तर प्रवासी ही परप्रांतीय असायचे. राज्यातील राष्‍ट्रीय महामार्गावर कदंब महामंडळाच्या बससेवा आहेत. त्यामुळे सरकारी खात्यामध्ये काम करणारे कर्मचारी हे कदंबचे पासधारक आहेत. त्यामुळे हे कर्मचारी खासगी बससेवा वापर करत नाहीत. या पाससेवेमुळे खासगी बस व्यवसाय अडचणीत आला होता व आता तर प्रवासीच मिळत नसल्याने हा खासगी बस मालकांचा व्यवसाय 
अडचणीत आला आहे. राज्यातील महाविद्यालये तसेच शाळाही बंद आहेत त्यामुळे विद्यार्थी प्रवासीही नाहीत. त्यामुळे प्रत्येक मार्गावर 
पूर्वीपेक्षा निम्म्या संख्येने खासगी बसगाड्या धावत आहेत. खासगी बससेवा नसल्याने ग्रामीण भागातील लोकांना बाजारहाटसाठी किंवा 
शहरात येण्यासाठी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कदंब बस एखादी धावत असल्यास तिची तासनतास वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे खासगी बससेवेअभावी लोकांना हिंडणे - फिरणेही मुष्किलीचे बनले आहे.  

 
 

संबंधित बातम्या