राज्यात खासगी वैद्यकीय महाविद्यालय होणार

प्रतिनिधी
रविवार, 30 ऑगस्ट 2020

दक्षिण गोवा सरकारी जिल्हा इस्पितळात खासगी वैद्यकीय महाविद्यालय वर्षभरात सुरू होणार आहे. तसा प्रस्ताव सरकारला सादर झाला आहे.

पणजी: दक्षिण गोवा सरकारी जिल्हा इस्पितळात खासगी वैद्यकीय महाविद्यालय वर्षभरात सुरू होणार आहे. तसा प्रस्ताव सरकारला सादर झाला आहे. राज्य सरकारने खासगी विद्यापीठांसाठी गोव्याची दारे खुली करण्यासाठी कायदा केल्यानंतर सादर झालेल्या प्रस्तावांत याही प्रस्तावाचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

सरकारने या प्रस्तावांवर विचार करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीत गोवा विद्यापीठाचे कुलगुरू, माजी कुलगुरू डॉ. सतीश शेटये, एनआयटीचे संचालक डॉ. गोपाळ मृगराया, आयआयटीचे संचालक प्रा. बी. के. मिश्रा, ॲड नरेंद्र सावईकर, उच्च शिक्षण सचिव, वित्त सचिव, जिल्हा न्यायदंडाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता आणि उच्च शिक्षण संचालकांचा समावेश आहे.

गेल्या १ एप्रिल रोजी हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर खासगी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे आपले संकुल राज्यात स्थापन करू शकतात. त्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांवर ही समिती विचार करून कोणते प्रस्ताव स्वीकारता येतील किंवा नाहीत, याबाबत निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री हे शिक्षणमंत्री या नात्याने या समितीच्या प्रमुखपदी आहेत. सध्या सहा खासगी विद्यापीठे स्थापन करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव आले असून त्यापैकी एक प्रस्ताव हा खासगी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आहे. त्या शैक्षणिक संस्थेकडे सामंजस्य करार करून मडगावचे जिल्हा सरकारी इस्पितळातील सुविधा विकसित करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी समितीत त्याही प्रस्तावावर चर्चा होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.शैक्षणिक संस्था सुरु करणाऱ्यांनी पाच कोटी रुपयांचा निधी उभारून त्यासाठी लागणारी जमीन व इतर सुविधा स्वखर्चाने उभाराव्या लागणार आहेत. 

संबंधित बातम्या