‘शेतकऱ्यांची समस्या  मुख्यमंत्र्यांकडे मांडणार’
The problem of the farmers To be presented to CM

‘शेतकऱ्यांची समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडणार’

म्हापसा : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भातील प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे विषय मांडणार असल्याचे आश्वासन आमदार ग्लेन टिकलो यांनी हळदोणे विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना दिले आहे.


हळदोणे येथे शेतकापणी यंत्राच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या ग्लेन टिकलो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले,  गेल्या काही दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे हळदोणे येथील शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. काही शेतकऱ्यांना शेतीची कापणी व मळणी वेळेवर करता आली नाही.


या प्रसंगी काही शेतकऱ्यांनी विभागीय कृषी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले, की त्यांना त्यांच्या शेताची कापणी करण्यासाठी पुरेसे अनुदान मिळाले नाही. कोविड-१९  रोगाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीमुळे सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.


या प्रसंगी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट केले की, यासंदर्भात शेतकऱ्यांनी घरमालकाकडून एक-चौदा उताऱ्याची प्रत सादर करावी लागेल किंवा कृषी कार्ड सादर करावे लागेल. काही जमीनमालकांनी एक-चौदा उताऱ्याची प्रत भाडेपट्टीवर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना दिली नसल्याची कैफियत शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडली. त्यासंदर्भात तोडगा काढणार असल्‍याचे कृषी अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले.


नुकसान झालेल्या शेतांची छायाचित्रे विभागीय कृषी कार्यालयाला शेतकापणीपूर्वी सादर करावीत. सरकारच्या वतीने त्यासंदर्भात पाहणी करून निर्णय घेतला जाईल, असेही कृषी अधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी विभागीय कृषी कार्यालय तत्पर असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com