खोतीगावातील समस्या सुटता सुटेनात

dainik gomantak
गुरुवार, 21 मे 2020
खोतीगावातील जीर्ण झालेल्या पुलाच्या लोखंडी सळया व मोडकळीस आलेले कठडे, पुलाची दुरवस्था , पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल....

काणकोण, 

काणकोण तालुक्यातील अतिदुर्गम पंचायत खोतीगावातील समस्या सुटून सुटत नाहीत, अशी परिस्थिती आहे. या पंचायत क्षेत्रात पेयजल समस्या पाचवीला पुजलेली आहे. गावडोंगरी येथील गावणे धरणाचे पाणी गावडोंगरी व खोतीगाव पंचायत क्षेत्राला पुरवण्यात येणार होते. त्यामुळे येथील किमान पेयजल समस्या तरी मिटण्याची शक्यता होती. उन्हाळ्यात पेयजल समस्येवर तोडगा काढण्यासाठी वर्षानुवर्षं येथील काही भागातील रहिवासी आटलेल्या नदीच्या पात्रात खड्डा खणून पिण्याचे पाणी मिळवीत आहेत. आजही खोतीगाववासींयाची हीच परिस्थिती आहे. काही ठिकाणी ग्रामीण जलपुरवठा योजनेखाली तीस वर्षापूर्वी कूपनलिका खोदण्यात आल्या होत्या. मात्र, त्या कूपनलिकेवरील नादुरुस्तत झालेले मोटारपंप वेळोवेळी दुरुस्त करण्यात येत नसल्याने ते असून नसून सारखेच आहेत, अशी येथील ग्रामस्थांची प्रतिक्रिया आहे.

खोतीगाव गेले वर्षभर आउट ऑफ रेंज
संपूर्ण गोव्यात संपर्क माध्यमाची क्रांती झाली असताना खोतीगाव मात्र गेले वर्षभर आउट ऑफ रेंज मध्येच आहे. पंचायत क्षेत्रात रिलायन्स कंपनीचा टॉवर होता. त्यानंतर आयडिया कंपनीने सेवा सुरू केली बीएसएनएलची लँडलाईन सेवाही लॉकडाऊन झाली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना कर्नाटकमधील शेजारच्या गावातील टॉवरवरून मिळणाऱ्या संपर्क रेंजचा शोध घेत पळावे लागते, त्यामुळे येथील रहिवासी सध्या येडा येथील माळरानावर कारवार येथील टॉवरची कनेक्टिव्हिटी मिळत असल्याने या माळरानावर जमा होत आहेत. त्याशिवाय त्यांना पैंगीण पंचायत क्षेत्रातील आमोणे येथे आल्यावर कनेक्टिव्हिटी मिळत आहे. मोबाईल फोनला कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने येथील रहिवाशांनी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्याकडे कैफियत मांडली होती. मात्र, त्यातून प्रश्न सुटला नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

पूल मोडकळीस

खोतीगावातील जुने पूल व साकव जीर्ण झाले असून त्यापैकी काही मोडकळीस आले आहेत. काही साकवांचे कठडे मोडलेले आहेत. काही पुलाच्या स्लॅबच्या लोखंडी सळया खाली लोंबकळू लागल्या आहेत. यापैकी सर्वच पूल व साकवाची बांधणी गोवा मुक्तीनंतर करण्यात आली होती. हे पूल व साकव कोसळल्यास खोतीगावचा उर्वरित काणकोण तालुक्याचा संपर्क तुटणार आहेत. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने या जीर्ण पूल व साकवाची पाहणी करावी, अशी मागणी येथील समाज कार्यकर्ते शांताराम देसाई यांनी केली आहे.

संबंधित बातम्या