गिरीतील गणेशविसर्जन स्थळाबाबत समस्या

Sudesh Arlekar
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

गणेशचतुर्थी उत्सव जवळ आल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या स्थळाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. ही समस्या गिरीवासीयांनी स्थानिक आमदार जयेश साळगावकर यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी गिरी पंचायतीच्या काही सदस्यांच्या तसेच काही नागरिकांच्या उपस्थितीत त्या स्थळाची पाहणी केली

म्हापसा,  गिरी येथील ग्रीन पार्क जंक्शनच्या परिसरात राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असलेल्या गणेशविसर्जन स्थळाबाबत सध्या समस्या निर्माण झाल्या असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हे विसर्जनस्थळ राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे थोडेसे बाजूला हलवण्यात आले आहे.
गणेशचतुर्थी उत्सव जवळ आल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या स्थळाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. ही समस्या गिरीवासीयांनी स्थानिक आमदार जयेश साळगावकर यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी गिरी पंचायतीच्या काही सदस्यांच्या तसेच काही नागरिकांच्या उपस्थितीत त्या स्थळाची पाहणी केली व गणेशभक्तांच्या भावना लक्षात घेऊन गणेशचतुर्थीपूर्वी हे काम पूर्ण करून घेण्यात आपण प्रयत्न करणार असल्याचे गिरीवासीयांना दिले.
आमदार साळगावकर पुढे म्हणाले, की गिरी येथील नव्या विसर्जनस्थळाकडे गणेशमूर्ती घेऊन जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अजूनही वाट करून दिलेली नाही. त्या ठिकाणी पायवाट व रॅम्प उभारण्याचे सरकारने ठरवले असले तरी ते काम गणेशचतुर्थीपूर्वीच पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे, ते काम त्वरित हाती घेण्याची सूचना प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मी यापूर्वीच केलेली आहे. तसेच, विसर्जनस्थळाच्या परिसरात विद्युत दिव्यांची सोय करण्याची सूचना वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
गिरी गावातील मोंतेगिरी व ग्रीन पार्क जंक्शन अशा दोन ठिकाणी असलेल्या वाहत्या पाण्याजवळ गणेशमूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे असली तरी या गावातील बहुतांश गणेशमूर्तींचे विसर्जन तार नदीच्या पट्ट्यातील ग्रीन पार्क जंक्शनजवळील छोटेखानी खाडीच्या स्वरूपात असलेल्या तलावात केले जाते.
महामार्गाला लागूनच असलेल्या त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून हे विसर्जनस्थळ कार्यरत आहे; परंतु, राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण व तिथे उड्डाणपुलाचे बांधकाम इत्यादी कामांच्या निमित्ताने सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी हेतूने ते विसर्जनस्थळ येथून बाजूलाच हलवण्यात आले. पूर्वीच्या स्थळाच्या बाजूलाच नवीन विसर्जनस्थळासाठी परिपूर्ण बांधकाम करून देण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले होते व त्याबाबत प्राधिकरणाचा संबंधित कंत्राटदारही राजी झाला होता, असा दावा गिरीतील काही नागरिकांनी केला आहे.
कंत्राटदाराने विसर्जनस्थळाचे बांधकाम केलेले आहे; परंतु, अवघ्या दिवसांवर चतुर्थी येऊन ठेपली असतानाही बांधकाम केलेल्या स्थळापर्यंत जाण्यासाठी मार्गाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे अपूर्णावस्थेतील बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी रहिवाशांनीपंचायत मंडळ व आमदार जयेश साळगावकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार साळगावकर यांनी उपसरपंच बाबाजी गडेकर, पंचायतसदस्य व रहिवाशांसमवेत विसर्जनस्थळाची पाहणी केली आहे.
 

संबंधित बातम्या