पर्वरीत पाण्याबरोबच विजेचीही समस्या

dainik gomantak
सोमवार, 18 मे 2020

येथील पाणी समस्याविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्याशी संपर्क साधला, परंतु ते मोबाईल उचलतच नाहीत, असा अनुभव आला आहे.

पणजी, 

पर्वरीत सध्या पिण्याच्या पाणीपुरवठ्‍याबरोबरच विजेच्या समस्येने तोंड वर काढले आहे. टाळेबंदीच्या काळात सध्या या परिसरात खासगी टँँकरचा व्यवसाय तेजित सुरू आहे. काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनाही अधूनमधून येणाऱ्या पाणीपुरवठ्‍याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच गेली काही दिवस खंडित वीज समस्याही येथील नागरिकांना भेडसावत आहेत.
या परिसरात राहणाऱ्या बहुतांश नागरिकांच्या पाण्याच्या टाक्या आहेत. किमान दहा हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या असल्यामुळे नळाला येणारे पाणी थेट टाकीत जाते. परंतु दोन तीन दिवसाने टाकीत पाणी येत असल्यामुळे टाकीतील पाणी पातळी वारंवार खालावत आहे. सध्या खेड्यात मिळणाऱ्या अपुऱ्या सेवेमुळे लोक शहरात पुन्हा येऊन राहू लागले आहेत. त्यामुळे घरात पाण्याचा वापर भरपूर होत होत आहे. हायलँड व्हिला यापरिसरात ज्येष्ठ नागरिक अधिकप्रमाणात राहतात. त्यांना वारंवार टँकर आणणे परवडत नसल्याची तक्रार त्यांनी ‘गोमन्तक'कडे केली.
विशेष बाब म्हणजे आरोग्य खाते घराबाहेरून आल्यानंतर हात धुवायला सांगते, त्यासाठी पाण्याचा वापर होतो. त्यातच उकाडा असह्य होत असल्याने अधूनमधुन हातपाय-तोंड धुवावे लागत असते त्यासाठीही पाणी लागते. येथील पाणी समस्याविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्याशी संपर्क साधला, परंतु ते मोबाईल उचलतच नाहीत, असा अनुभव आला आहे. त्यामुळे मंत्री नक्की कोणासाठी आहेत, हे काही कळत नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया गजानन बा. नायक भाटकर यांनी व्यक्त केली आहे.

खंडित वीज समस्या..!
पाणी समस्येबरोबरच आता पर्वरी परिसरात खंडित विजेची समस्या भेडसावू लागली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचा चटका बसत आहे. त्यामुळे वातावरणातील तपमान वाढत असल्याने उकाडा असह्य होत आहे. त्यातच सध्या काही दिवसांपासून वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार पर्वरी परिसरात होऊ लागले आहेत. अगोदरच पाण्याची समस्या आणि आता विजेची समस्या यामुळे येथील नागरिकांच्या समस्येत आणखीच भर पडली आहे.

संबंधित बातम्या