मुख्‍यमंत्र्यांनी जाणून घेतल्‍या झुआरीनगरमधील समस्‍या

Sunil Sheth
शुक्रवार, 31 जुलै 2020

कुठ्ठाळीच्‍या आमदार श्रीमती एलिना साल्‍ढाणा यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेऊन झुआरीनगर येथील कंटेन्‍मेंट झोनमधील समस्या सोडवण्यासाठी आढावा घेतला. ही बैठक पर्यटन भवनमधील मुख्यमंत्री कार्यालयात पार पडली.

सुनील शेठ

कुठ्ठाळी :

कुठ्ठाळीच्‍या आमदार श्रीमती एलिना साल्‍ढाणा यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेऊन झुआरीनगर येथील कंटेन्‍मेंट झोनमधील समस्या सोडवण्यासाठी आढावा घेतला. ही बैठक पर्यटन भवनमधील मुख्यमंत्री कार्यालयात पार पडली.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कुठ्ठाळीच्‍या आमदार श्रीमती एलिना साल्‍ढाणा, मुख्यसचिव परिमल राय, आरोग्यसचिव नीला मोहनन, दक्षिण जिल्हाधिकारी अजीत रॉय, मुरगाव उपजिल्हाधिकारी सचिन देसाई, पोलिस महासंचालक मुकेश कुमार मिना, पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंह, उपअधीक्षक राजू राऊत देसाई, निरीक्षक मोहन गावडे, आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा, कुठ्ठाळी आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. सुकोर क्वाद्रोस यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.
या उच्चस्तरीय बैठकीमध्ये आमदार साल्‍ढाणा यांनी झुआरीनगर येथील कंटेन्‍मेंट झोनमधील लोकांच्या विविध समस्या समितीसमोर मांडल्या. त्यावर मत व्यक्त करताना जिल्हाधिकारी अजीत रॉय व आरोग्यसचिव नीला मोहनन यांनी केंद्राच्‍या मार्गदर्शक तत्त्‍वांनुसार कंटेन्‍मेंट झोनचे नियम उठवले किंवा शिथिल केले जाऊ शकत नाही. तसेच येथून कुणाला आत - बाहेर जाता येत नाही. केवळ १४ दिवसांनी एकही रुग्ण न सापडल्यास यावर विचार केला जाऊ शकतो.
जिल्हाधिकारी अजीत रॉय म्हणाले की, झुआरी इंडस्‍ट्रीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना तपासणी करून पॉझिटिव्‍ह असलेल्‍यांना कंपनीच्या परिसरात ठेवले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्‍ह आल्यानंतर त्यांना परत कामावर घेण्यात आले. यामध्ये झुआरीनगरमधील कामगारांचा समावेश होता.

लोकांना जीवनावश्‍‍यक
वस्‍तू पुरवा : मुख्‍यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले की, कंटेन्‍मेंट झोनमधील लोकांना आवश्यक ते सामान किंवा कडधान्य वेळेवर उपलब्ध करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्यावेत, असे निर्देश देण्‍यात आले. शिधापत्रकधारकांना धान्य पुरवण्याची संकेतही त्‍यांनी दिले. ज्‍या लोकांना स्वतःची तपासणी करून घ्यायची आहे, त्यांनी झुआरीनगर येथील सरकारी शाळेत जाऊन तपासणी करून घ्यावी. तसेच कंटेन्‍मेंट झोनमधील लोकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्‍यांच्‍याविरुद्ध कठोर कारवाई करावी, असेही त्‍यांनी पोलिसांना सांगितले.

 

- महेश तांडेल

 

संबंधित बातम्या