माहिती आयुक्त रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

राज्यातील माहिती आयोग कार्यालयातील मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तांची दोन पदे रिक्त आहेत, ती भरण्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे.

पणजी: राज्यातील माहिती आयोग कार्यालयातील मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्तांची दोन पदे रिक्त आहेत, ती भरण्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. या पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराची मुदत आता पाच वर्षांऐवजी तीन वर्षाची करण्यात आली आहे. सध्या कार्यरत असलेल्या माहिती आयुक्त प्रतिमा वेर्णेकर यांचीही मुदत येत्या डिसेंबरमध्ये संपणार आहे त्यामुळे हे पदही रिक्त होणार आहे. 

या रिक्त असलेल्या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत २४ सप्टेंबर आहे. या पदासाठी विशेष शैक्षणिक पात्रतेची आवश्‍यकता नाही मात्र उमेदवाराचे समाजातील स्थान, विशिष्ट क्षेत्रातील म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान, समाज सेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, प्रसार माध्यमे वा प्रशासन आणि शासन यामधील व त्या क्षेत्राशी अनुभव असणे आवश्‍यक आहे. राजकीय पक्षाशी संबंधित असलेले किंवा लाभाचे पद भूषविलेले तसेच आजी - माजी खासदार व आमदार हे अर्ज करण्यास अपात्र आहेत. या पदाची मुदत पाच वर्षे होती त्यात दुरुस्ती करून ती आता तीन वर्षे करण्यात आली आहे. 

२०१५ मध्ये मुख्य आयुक्त व दोन माहिती आयुक्तांची निवड करण्यात आली होती. मुख्य माहिती आयुक्त लिना मेहेंदळे यांची मुदत जानेवारी २०१५ मध्ये संपल्याने तसेच २०१२ पासून रिक्त असलेल्या दोन माहिती आयुक्त पदांवर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने ही निवड केली होती. 

तीन वर्षाच्या मुदतीसाठी निवड झालेल्या मुख्य माहिती आयुक्त व माहिती पदासाठी प्रत्येकी २.२५ लाख रुपये वेतन तसेच वय ६५ वर्षे होईपर्यंत किंवा तीन वर्षू पूर्ण होईपर्यंत जे आधी होईल ते लागू असेल. मुख्य माहिती आयुक्त प्रशांत तेंडुलकर व माहिती आयुक्त ज्युईनो डिसोझा हे निवृत्त झाल्याने ही पदे रिक्त झाली आहेत. माहिती हक्क कायद्याखाली विविध खात्याकडून माहिती देण्यास नकार दिल्यास त्याविरुद्ध माहिती आयुक्तांकडे अपिल करण्यात येतात. सध्या एकमेव माहिती आयुक्त असल्याने व कोविड काळात अशा अर्जांची सुनावणी निर्बंधित करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या