श्रद्धानंद विद्यालयातर्फे शैक्षणिक यु ट्यूबची निर्मिती

सुभाष महाले
बुधवार, 29 जुलै 2020

पैगीण-काणकोण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयाने कोरोना महामारीच्या संकटकाळात ऑनलाईन शिक्षण प्रणालीला पुरक शैक्षणिक संसाधन म्हणून शैक्षणिक यु ट्यूबची निर्मिती करण्यास सुरवात केली आहे.

काणकोण

या उपक्रमाचा पहिला भाग म्हणून पाचवी इयत्तेच्या मराठी पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. तालुका सुकाणू समितीच्या मराठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची बैठक होऊन या बैठकीत हा विचार पुढे आला. त्यामध्ये श्रद्धानंद विद्यालयाच्या मराठी शिक्षकांनी पुढे येऊन हा उपक्रम सुरू केला आहे.
पुस्तकातील पहिली कविता ‘आला पाऊस’ या कवितेच्या यु ट्युबचे अनावरण शिक्षकांच्या उपस्थितीत श्रद्धानंद ज्ञानप्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण भट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष तारका शिरोडकर, मुख्याध्यापिका सीमा प्रभुगावकर उपस्थित होत्या. यावेळी भट यांनी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन केले. श्रद्धानंद विद्यालय शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच नवीन नवीन प्रयोग राबवित आहे. विद्यालयातील शिक्षकांनी पूर्वीच ऑनलाइन शिक्षण प्रणाली सुरू केली होती, असे त्यांनी सांगितले.
या यु ट्यूब निर्मितीचे शिवधनुष्य शिक्षक चिन्मय आमशेकर, संकेत वारीक, प्रणिता नाईक गावकर, सागर वेळीप, तन्वी नाईक यांनी उचलले आहे. या पहिल्या कवितेचे स्वरबद्ध गायन विद्यार्थी शिवांग प्रभू यांनी केले आहे.

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या