
प्रत्येक विद्यार्थ्याने कला आणि संगीतातील त्याच्या आवडीचे पालन करावे. योग्य प्रयत्न केल्यास त्यांच्या छंदांचे व्यवसायात रूपांतर होऊ शकते. ‘क्रिएटर्स कनेक्ट’द्वारे पटकथा लेखन आणि गायन या क्षेत्रात गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक दरवाजे उघडता येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता ओळखण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पणजीतील गोवा मनोरंजन सोसायटीत आयोजित ‘क्रिएटर्स कनेक्ट’च्या उद्घाटन समारंभात सावंत आॕनलाईन माध्यमाद्वारे बोलत होते.
उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा राज्य उच्च शिक्षण परिषदेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पार्श्वगायिका रागिणी कवठेकर, ‘सरकार राज’ या बॉलिवूड चित्रपटाचे लेखन करणारे पटकथा लेखक प्रशांत पांडे, ‘बोहनीमान..द फोक फ्लोज’ अल्बमचे संगीतकार डोनी हजारिका, भारतीय दूरचित्रवाणी व वेब मालिका लेखक सुमृत शाही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च शिक्षण संचालनालयाचे अतिरिक्त संचालक प्रा. जर्वासिओ एस. एफ. एल मेंडिस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरवात मुगाफी (अनलू) फेलोशिप शोरीलच्या स्क्रीनिंगने झाली.
राज्य सरकारचा पहिलाच अनोखा उपक्रम
गोवा राज्य उच्च शिक्षण परिषद, उच्च शिक्षण संचालनालय, आणि मुगाफी यांच्यातील सामंजस्य कराराचा भाग म्हणजे ‘क्रिएटर्स कनेक्ट’ हा कार्यक्रम होय. शासनाचा अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम आहे. गोव्यातील तरुण, महत्त्वाकांक्षी लेखक आणि संगीतकारांना त्यांच्या सर्जनशीलतेचे प्रदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम प्रोत्साहन देईल.
त्याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी संगीत, नृत्य, पटकथालेखन आणि कथाकथन यामध्ये प्रशिक्षित करणे आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देणे हा उद्देश आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
350 विद्यार्थ्यांचा सहभाग : गोवा राज्यातील 40 उच्च शैक्षणिक संस्थांमधील एकूण 350 विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी संगीत, नृत्य, नाटक आणि कथाकथन कलागुणांचे दर्शन घडविले. हे विद्यार्थी आता बूटकॅम्प, ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण तसेच हँड-ऑन अॅक्टिव्हिटीजच्या रूपात सखोल प्रशिक्षणांना उपस्थित राहतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.