चिंबल तळ्यातील पाण्याच्या तपासणीनंतरच प्रकल्प

dainik gomantak
शनिवार, 30 मे 2020

याप्रसंगी पाऊसकर म्हणाले की, १९०९ मध्ये पोर्तुगीजांनी हे तळे बांधले. आमदार म्हणून टोनी रॉड्रिग्ज गेले तीन वर्षांपासून तळ्यातील पाण्याचा वापर येथील जनतेसाठी व्हावा म्हणून मागे लागले आहेत.

पणजी,

चिंबल येथील तळ्यातील पाण्याची तपासणी केली जाईल आणि तेथे ३ एमएलडी पाणी प्रकल्प उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे. पाण्याची चाचणी घेतल्यानंतर या कामास खऱ्या अर्थाने सुरवात होईल आणि त्याला दीड वर्षांचा कालावधी लागेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले.
मंत्री पाऊसकर यांनी आज आमदार टोनी रॉड्रिग्ज, सरपंच चंद्रकांत कुंकळकर, जैवविविध संघटनेचे गोविंद शिरोडकर यांच्यासह, जलस्रोत खाते, अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पाऊसकर म्हणाले की, १९०९ मध्ये पोर्तुगीजांनी हे तळे बांधले. आमदार म्हणून टोनी रॉड्रिग्ज गेले तीन वर्षांपासून तळ्यातील पाण्याचा वापर येथील जनतेसाठी व्हावा म्हणून मागे लागले आहेत. तळ्यातील पाण्याचे नमुने आता आणि पुन्हा पावसाळ्यात तपासले जातील. त्यानंतर प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेस सुरवात होईल. तळ्याच्या बाजूला सरकारी जमीन असल्याने तेथे तीन एमएलडी प्रकल्प उभा राहील. त्यासाठी सुमारे २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्राकडून जलजीवन योजनेतून दहा कोटी रुपये मिळतील आणि दहा कोटी राज्य सरकार खर्च करेल. या परिसरातील जनतेची अनेक दिवसांपासूनची मागणी या प्रकल्पामुळे पूर्ण होईल.
आमदार रॉड्रिग्ज म्हणाले की, येथील पाण्याचा वापर पिण्यासाठी की शेतीसाठी होईल, हे पाणी तपासणीनंतर ठरेल. बऱ्याच दिवसांपासून पाणी साठविल्याने त्याची तपासणी गरजेची आहे. ग्रामस्थांनी पाठिंबा दिल्यावर हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. आपली विनंती मान्य करून मंत्री पाऊसकर यांनी या तळ्याची पाहणी केल्याबद्दल त्यांनी आभार मानले. याप्रसंगी शिरोडकर यांनी जर या प्रकल्पाला निधी कमी पडला, तर आदिवासी कल्याण निधीचा वापर करता येऊ शकतो, अशी सूचनाही मांडली.

 

संबंधित बातम्या