गोमेकॉत रुग्णांवर होत आहेत योग्य उपचार..!

प्रतिनिधी
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

फातिमा डिसिल्वा यांच्याकडून आरोग्यमंत्र्यांची स्तुती 

पणजी: राज्यातील प्रसिद्ध असलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात सामान्य लोकांना चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा मिळत असून आरोग्यमंत्री स्वतः त्यावर लक्ष ठेवत असूनही त्याविरुद्ध विनाकारण टीका केली जात असल्याची माहिती देऊन बेतालभाटी येथील फातिमा डिसिल्वा यांनी आपला अनुभव सांगताना आरोग्यमंत्र्यांची स्तुती केली.  

माझा १३ वर्षाचा भाचा होरपळल्याने त्याला गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले. इस्पितळात चांगली आरोग्य सेवा व सुविधा जात नसल्याने माझा या इस्पितळात जाण्यास विरोध होता. मात्र कोणताही पर्याय नसल्याने या इस्पितळात गेलो. हॉस्पिसिओ इस्पितळ येथील रुग्णवाहिकेने त्या मुलाला गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. या सरकारी इस्पितळातून त्वरित झालेल्या हालचालीने मी सुद्धा अचंबित झाले. अशा प्रकारची सेवा खासगी इस्पितळातही मिळणे कठीण आहे असे त्या म्हणाल्या.
 
त्यानंतर काही दिवसांनी होरपळलेल्या मुलाची चौकशी करण्यासाठी बहिणीशी संपर्क साधला असता गोमेकॉ इस्पितळात उत्तम प्रकारे उपचार मिळत असल्याचे सांगितले. रुग्णाच्या आजारानुसार इस्पितळात आहार दिला जातो व डॉक्टर्स तसेच परिचारिकांची सेवाही तत्पर आहे. इस्पितळात वॉर्डमधील स्वच्छता खासगी इस्पितळांना लाजवण्याइतपत स्वच्छ आहे. हे सर्व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे स्वतःहून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी जातीने लक्ष घालत असल्याने शक्य आहे. ते अचानक इस्पितळाला भेट देऊन तपासणी करत असल्याने कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणावर निर्बंध आले आहेत. 

गोमेकॉच्या वॉर्ड क्रमांक ११८ मध्ये असलेल्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छताही उल्लेखनीय आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यानी अशाचप्रकारे रुग्णांना चांगली सेवा मिळवून देण्यासाठी कार्यरत राहण्याचे विनंती डिसिल्वा यांनी केली आहे.

संबंधित बातम्या