म्हापसा जिल्हा ग्रंथालयाचा प्रस्ताव रेंगाळला

सुदेश आर्लेकर
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

मंत्री गोविंद गावडे यांनी सहा महिन्यांपूर्वी दिले होते आश्वासन

म्हापसा: दुरुस्तीकामानिमित्त बंद ठेवलेल्या म्हापसा येथील पालिका ग्रंथालयाची कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी पाहणी करून, दुरुस्तीकाम करून या ग्रंथालयाला जिल्हा ग्रंथालयाचा दर्जा देण्याचे पत्रकारांसमोर बोलताना स्पष्ट केले होते; तथापि, तो प्रस्ताव रेंगाळलेला आहे.

या ग्रंथालयाची निगा व देखभाल करणे शक्य न झाल्याने हे ग्रंथालय गोवा सरकारच्या कला व संस्कृती खात्याकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय म्हापसा पालिकेने घेतला आहे. गेल्या सप्टेंबरपासून अर्थांत गेले वर्षभर हे ग्रंथालय बंदच आहे. म्हापसा पालिकेने अलीकडेच येथील हुतात्मा चौकात आयोजित केलेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात बोलताना म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनी स्पष्ट केले आहे, की या ग्रंथालयाचे दुरुस्तीकाम सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे ३० डिसेंबरनंतरच सुरू होणार आहे. त्यामुळे, निदान आगामी वर्षभरता ते दुरुस्तीकाम पूर्ण होण्याची शक्यताच नाही.

या ग्रंथालयाची इमारत मोडकळीस आल्याने सप्टेंबर २०१९ पासून हे ग्रंथालय वाचकांसाठी बंदच असल्याचे वृत्त दै. ‘गोमन्तक’मध्ये सहा महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच दिवशी कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी म्हापसा येथे येऊन मोडकळीस आलेल्या या ग्रंथालयाच्या इमारतीची पाहणी केली होती. ग्रंथालयाच्या हस्तांतरणाचा करार म्हापसा पालिका व गोवा सरकार यांच्यात झाल्यानंतर या इमारतीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन त्या वेळी मंत्री गावडे यांनी नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांना दिले होते. परंतु, ‘कोविड १९’ मुळे सर्व काही रेंगाळले आणि यासंदर्भात गोवा सरकार आणि म्हापसा पालिका यांचा करारही अद्याप झालेला नाही.

इमारत मोडकळीस आल्याने दुरुस्तीच्या कारणास्तव हे ग्रंथालय गेल्या सप्टेंबरपासून वाचकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. परंतु, ‘कोविड १९’मुळे या ग्रंथालयाची दुरुस्ती आणखीन लांबणीवर पडलेली आहे, असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष रायन ब्रागांझा देत आहेत. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे, की म्हापसा नगरपालिकेने सध्या हे ग्रंथालय गोवा सरकारच्या कला व संस्कृती खात्याकडे हस्तांतरित करण्याचा ठराव घेतल्यानंतर त्यासंदर्भातील शासकीय कामकाज अतिशय संथ गतीने चालले. त्यामुळेच, त्यासंदर्भातील करार अद्याप होऊ शकला नाही.

या ग्रंथालयासंदर्भात प्रकर्षाने भेडसावणारे दोन प्रमुख मुद्दे सध्या ऐरणीवर आहेत. एक म्हणजे, या ग्रंथालयातील पोर्तुगीज काळापासूनचा ऐतिहासिक दस्तऐवज आणि पुस्तके यांचे जतन-संवर्धन करण्याची आवश्यक आहे. अन्यथा हा ज्ञानसमृद्ध ठेवा धुळीमुळे अथवा वाळवीमुळे नामशेष होण्याचा धोका आहे. दुसरे म्हणजे या ग्रंथालयाचे दुरुस्तीकाम पूर्ण होईपर्यत म्हापशातील लोकांसाठी तात्पुरता वाचनकक्ष उपलब्ध करणे. बार्देश तालुक्यातील वाचकांबरोबरच पेडणे, डिचोली, सत्तरी व तिसवाडी तालुक्यातील वाचकही या ग्रंथालयाचा नित्यनेमाने वापर करीत आहेत. या ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर करून कित्येकांनी एम.फिल, पी.एच्‍डी. साठी स्वत:चे शोधनिबंध तयार करून डॉक्टरेट व अन्य पदव्या मिळवलेल्या आहेत. अशा ज्ञानपिपासू विद्यार्थ्यांची सोय येथे लवकरात लवकर करणे अत्यावश्यक आहे.

म्हापशातील वाचकांसाठी तात्पुरता वाचनकक्ष कदंब बसस्थानकाच्या बाजूला असलेल्या पालिकेच्या दोन गाळ्यांत उभारण्याचे आश्वासन सहा महिन्यांपूर्वी देण्यात आले होते; पण, त्याबाबतही काहीच झाले नाही, असा दावा एक वाचक रोलंड मार्टिन्स यांनी केला आहे. दरम्यान, कोविडच्याच नावावर सारे काही खपवले जातेय, अशी टीका म्हापशातील वाचक यासंदर्भात करीत आहेत.

ग्रंथ भांडाराला वाळवी लागण्याची भीती
वर्ष १८८३ मध्ये सुरू झालेल्या म्हापसा नगरपालिकेच्या ग्रंथालयाने १३६ वर्षांचा दीर्घ टप्पा पार केलेला आहे; तथापि, या ‘आथाईद नगरपालिका ग्रंथालया’तील पुस्तकांना वाळवी लागण्याची भीती म्हापसा परिसरातील वाचनप्रेमींनी व्यक्त केली आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी, कोकणी, फ्रेंच व पोर्तुगीज व लॅटिन या भाषांतील काही दुर्मीळ ग्रंथही या ग्रंथालयात मिळू शकतात. तत्त्वज्ञान, धार्मिक, समाजशास्त्र, साहित्य, भाषाविज्ञान, व्याकरण, कला, इतिहास, भूगोल, विज्ञान, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, मनोरंजन, पाककला, ऑटोमोबाइल्स, अर्थशास्त्र इत्यादी अनेकविध विषयांवरील जवळजवळ पंचवीस हजार ग्रंथ व इतर पुस्तके सध्या या ग्रंथालयात आहेत.

संबंधित बातम्या