साळावली येथे नवीन १०० एमएलडी प्रकल्पाचा प्रस्ताव

साळावली येथे नवीन १०० एमएलडी प्रकल्पाचा प्रस्ताव

सासष्टी

दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणाऱ्या साळावली जलशुद्धीकरण प्रकल्पाला जोडूनच १०० एमएलडी क्षमतेचा नवीन प्रकल्प उभारण्यात येणार असून नवीन प्रकल्पामुळे दक्षिण गोव्यात मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. सांगे, केपे, सासष्टी, मुरगाव या तालुक्यांबरोबरच फोंडा, सांत आंद्रे व पणजीलाही याचा लाभ मिळणार आहे.
सळावली (शेळपे) येथील मुख्य व जायकाखालील पाणी प्रकल्पातून २६० एमएलडी पाणी पुरवण्यात येत असून नवीन १०० एलएलडी क्षमतेचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ३६० एमएलडी पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. पुढच्या २० वर्षांवर लक्ष ठेवून हा १०० कोटींचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून दक्षिण गोव्याबरोबर उत्तर गोव्यातील काही भागात या प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. १०० एमएलडी पाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जागाही निश्चित करण्यात आलेली असून वन विभागाच्या जागेत हा प्रकल्प उभारण्यात येत असल्यामुळे वन विभागाकडून मान्यता मिळविण्यात आलेली आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी सांगितले
या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये खर्च करावे लागणार असून ही निधी जल जीवन अभियान या राष्ट्रीय योजनेअंतर्गत मिळविण्याची प्रक्रिया सुरू आहे. केंद्राकडून निधी उपलब्ध झाल्यावर डिसेंबर महिन्यात हा प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असून हा प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण करण्यासाठी भर देण्यात येणार आहे, अशी माहिती पावसकर यांनी दिली.
गोव्यात वाढणाऱ्या लोकसंख्येला केंद्रस्थानी ठेवून पुढच्या २० वर्षांचे योग्यरीत्या नियोजन करून हा प्रकल्प उभाण्यात येत आहे. केंद्र सरकारचा जल जीवन अभियानांतर्गत हा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्राला प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारकडून प्रकल्प उभारण्यासाठी निधी मंजूर झाल्यास डिसेंबर महिन्याचा अखेरपर्यंत प्रकल्पाचा कामास सुरुवात होणार आहे. या प्रकल्पातील पाणी दक्षिण गोव्याबरोबर उत्तर गोव्यातील सांतआंद्रे, पणजी व अन्य ठिकाणी पाणी पुरविण्यात येणार आहे, असे पावसकर यांनी सांगितले. साळावली येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सीएनएफ फिल्टर टॅंक असून एका टॅंकमधून 40 एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यातील सध्या तीन फिल्टर टॅंक चालू स्थितीत असून बिघड झालेल्या अन्य एक फिल्टर टॅंकचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार आहे.
कुर्टी-ओपा जलवाहिनीचे काम ‘कोरोना’मुळे रखडले
कुर्टी खांडेपार ते ओपा दरम्यान ७०० एमएम व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली होती. पण, कोरोना महामारीमुळे जलवाहिनी बदलण्याच्या कामावर बंद करण्यात आलेला आहे. ही वहिनी जुनी झाल्यामुळे अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचा घटना घडत होत्या त्यामुळे सुमारे २.८ कोटी रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, ज्या कंत्राटदाराला हे काम सोपविण्यात आलेले आहे तो गुजरातमधील असल्यामुळे सध्याचा कोरोनाचा काळात वहिनी बदलण्याचे काम सुरू करणे कठीण बनलेले आहे. तरी, डिसेंबर पर्यत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com