‘गोंयात कोळसो नाका’

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

कोळसा वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर आज चांदोर भागात होणाऱ्या रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणाच्या कामास विरोध करण्यासाठी ‘गोंयात कोळसो नाका’ संघटनेने ‘आमका नाका, गोंयात कोळसो, आमका नाका..,’ अशी जोरदार घोषणाबाजी केली.

सासष्टी : कोळसा वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर आज चांदोर भागात होणाऱ्या रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणाच्या कामास विरोध करण्यासाठी ‘गोंयात कोळसो नाका’ संघटनेने ‘आमका नाका, गोंयात कोळसो, आमका नाका..,’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. चांदोर चर्चकडून चांदोर रेल्वे फाटकापर्यंत मेणबत्ती रॅली काढून निषेध व्यक्त केला. या रॅलीत गोव्यातील विविध भागांतील आठ हजारांच्यावर गोमंतकीय नागरिक सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी चांदोर चर्च ते चांदोर रेल्वे फाटकापर्यंत येऊन ठाण मांडले. या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड तसेच काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला, तर या रॅलीत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई व अन्य नेतेमंडळी व कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. 

या आंदोलनास विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला असल्याने मोठ्या प्रमाणात लोक चांदोर भागात जमले होते. आंदोलन असेच चालू राहिल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागल्याने या ठिकाणी रात्री उशिरा पोलिस तैनात करण्यात आले. सकाळपर्यंत हे विरोधकर्ते या ठिकाणी ठाण मांडून बसून राहणार असल्याची आंदोलनकर्त्यांनी दिली. 

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी चांदोर रेल्वे क्रॉसिंग बंद करून रुळाचे दुपदरीकरण करण्याचा आदेश मागे घ्यावा, अशी मागणी करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश मागे न घेतल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले आहेत. अशा परिस्थितीत रेल्वे अधिकाऱ्यांनी कामास सुरवात केल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवेदनाद्वारे दिला होता इशारा
दोन दिवसांपूर्वी गोंयात कोळसो नाका संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मागे घेण्यासाठी निवेदन सादर केले होते. तसेच आदेश मागे न घेतल्यास रस्त्यावर येऊन दुपदरीकरणाच्‍या कामास विरोध केला जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. असे असतानाही प्रशासनातर्फे काहीही पावले उचलण्यात येत नसल्याने लोक संतप्त झाले असून गोमंतकीयांच्या मनात खदखदणारा राग आज चांदोर भागात काढलेल्या रॅलीतून दिसून आला. सरकारने तरीही यावर लक्ष केंद्रित न केल्यास क्रांती घडविण्यात येणार असल्याचे गोंयात कोळसो नाका संघटनेने स्पष्ट केले आहे. 

सोशल मीडियावर उमटल्‍या प्रतिक्रिया
२७ ऑक्टोबर रोजी सां जुझे आरियल येथे पंचायतीकडून परवानगी न घेता रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणाचे काम करण्यात येत असल्यामुळे विरोध करण्यात आला होता. मात्र, यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी अरेरावी करून काम पूर्ण केले होते. आज काय होणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असून प्रत्यक्षात आंदोलनास सहभागी होता न आलेल्या लोकांनी सोशल माध्यमातील लाइव्ह सुविधेने पाठिंबा देण्यास सुरवात केलेली आहे. सुमारे आठ हजार नागरिक या आंदोलनात सहभागी झाल्‍याने आंदोलनाची झळ व तीव्रता आणखी वाढण्‍याची शक्यता व्‍यक्‍त केली जात आहे.
आंदोलन लोकांसाठी, पक्षीय नव्‍हे..!
कोळसा वाहतुकीसाठी करण्यात येणाऱ्या रेल्वे दुपदरीकरणास विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या या आंदोलनास काँग्रेस पक्ष तथा इतर विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला. त्‍यामुळे मोठ्या संख्येने लोक चांदोर रेल्वे फाटकाकडे जमले होते. या रॅलीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाचे झेंडे फडकविण्यास सुरू केल्याने काही वेळासाठी तेथे तणावस्थिती निर्माण झाली होती. पण, हे आंदोलन केवळ पक्षासाठी नसून गोव्यातील लोकांच्या हितासाठी आहे, अशी समज दिल्याने शेवटी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे खाली करून पाठिंबा देण्यास देण्यास सुरवात केली.

संबंधित बातम्या