कारवारवासीयांचा इशारा: सीमा खुली करा, अन्यथा दूध, भाजी वाहतूक रोखू

प्रतिनिधी
रविवार, 30 ऑगस्ट 2020

कारवारवासीयांचा इशारा, पोळे तपासणी नाक्यावर आंदोलन, माजाळीत धरणे

काणकोण: कारवारमधून येणारी भाजी, दूध गोव्याला चालते, मात्र माणसांना प्रवेश नाकारण्यात येतो, हा कुठला न्याय? असा खडा सवाल कारवारमधील मोर्चेकऱ्यांनी पोळे तपासणी नाक्यावर धडक देऊन गोवा सरकारचे प्रतिनिधी काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू यांना विचारला. कारवारच्या आमदार रूपाली नाईक व माजी आमदार सतीश सैल यांनी १ सप्टेंबरपासून पोळे तपासणी नाका खुला करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याचे सांगितल्याने आंदोलन सौम्य करण्यात आले आहे. दरम्यान, माजाळीत याच मागणीसाठी वक्रतुंड विद्यार्थी संघटनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.

१ सप्टेंबरला तपासणी नाका खुला न झाल्यास ५ सप्टेंबरला सकाळी ६ वाजल्यापासून गोव्यातील कर्नाटक हद्दीत येणारी व गोव्याकडे मासे, भाजी व दूध तसेच अन्य सामान घेऊन जाणारी वाहने अडवण्यात येणार असल्याचा इशारा विद्यार्थी संघटनेचे रघू नाईक यांनी दिला आहे.  सदाशिवगड जिल्हा अध्यक्ष भास्कर पटकार, टॅक्सी संघटनेचे संतोष नाईक, रिक्षा संघटनेचे संदीप नाईक, अंकोला रिक्षा संघटनेचे विजयकुमार नाईक उपस्थित होते. या शिवाय कारवारचे पोलिस निरीक्षक नित्यानंद नाईक, दिलीप नाईक, संजू म्हाळशेकर उपस्थित होते.

गोवा सरकारच्या धोरणाविरुद्ध कारवारवासीयानी माजाळी येथे शनिवारी धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले. केंद्र सरकारने सर्व राज्यासाठी कोविड महामारी संदर्भात सामायिक एसओपी पाठवली असताना गोवा सरकारने अद्याप पोळे चेक नाका खुला केला नाही, उलट कोरोनाच्या नावांखाली सरसकट लूट चालवली आहे. त्याचा फटका कारवारवासीयांना बसत आहे,  त्याची दखल येथील वक्रतुंड विद्यार्थी संघटनेने घेऊन आज (ता.२९) सकाळी माजाळी तपासणी नाक्या बाहेर धरणे धरले. 

गोव्यात राज्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्यासाठी तीन पर्याय दिले आहेत. मान्यताप्राप्त डॉक्टराची कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र, ज्याची वैद्यता ४८ तासाची असेल. दुसरा पर्याय होम क्वॉरंटाईन व तिसरा दोन हजार रुपये शुल्क भरून कोरोनासाठी स्वॅब चाचणी करून घेणे, असे हे तीन पर्याय असल्याचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू यांनी आंदोलकांना सांगितले. या पर्यायांना आंदोलकांनी आक्षेप घेतला. दोन हजार दिल्यानंतर काही वेळेला पोच पावती दिली जात नाही, त्याचप्रमाणे स्वॅब चाचणीसाठी पोच पावती घेऊन मडगावला जावे लागते, त्यासाठी स्वॅब चाचणीची व्यवस्था पोळे तपासणी नाक्यावर करण्याची मागणी आंदोलकांनी केली. 

काणकोणचे पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण, मामलेदार विमोद दलाल उपस्थित होते. आंदोलकांनी माजाळी तपासणी नाक्याजवळ धरणे धरले, त्यानंतर माजाळी नाका व पोळे तपासणी नाका या दरम्यान असलेल्या ‘नो मेन्स लेन्ड’मध्ये येऊन गोवा सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.
 

संबंधित बातम्या