मोप विमानतळ महामार्ग रद्द करेपर्यंत लढा सुरुच राहणार; धारगळ संघर्ष समितीचा इशारा

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 मार्च 2021

काजू बागयती व शेती ही आमच्या उपजीविकेची साधने आहेत. त्यावरच आमच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो, जोपर्यंत मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचा राष्ट्रीय महामार्ग व ॲरो सिटी रद्द होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे धारगळ संघर्ष समितीतर्फे काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सरकारला इशारा दिला.

पेडणे :  काजू बागयती व शेती ही आमच्या उपजीविकेची साधने आहेत. त्यावरच आमच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो, जोपर्यंत मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीचा राष्ट्रीय महामार्ग व ॲरो सिटी रद्द होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे धारगळ संघर्ष समितीतर्फे काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सरकारला इशारा दिला. या पत्रकार परिषदेला भरत बागकर, रमाकांत तुळसकर, मनोज साळगावकर, संदीप कांबळी, अंकुश आरोंदेकर, प्रकाश पाळयेकर, विनायक च्यारी, राजेंद्र राऊळ, प्रताप कानोळकर उपस्थित होते. भरत बागकर बोलताना म्हणाले, येथील शेतकऱ्यांची जमीन यापूर्वी विमानतळ, तिळारी पाट आयुश इस्पितळ, क्रिडा नगरी यासाठी कवडी मोलाच्या दराने घेण्यात आली आहे, तर बऱ्याच जमीनीचा अजीबात मोबदला मिळालेला नाही.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून पलायन करणारे कैदी पुन्हा ताब्यात

शंभर मिटर रुंदीच्या या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होणार आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी विमानतळापर्यंत जाण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी झालेल्या चर्चेत जवळचे व कमीच कमी नुकसानी होईल, अशा दुसऱ्या काही जागा दाखविल्या. मुख्यमंत्र्यांनाही ते पटले व त्याबाजूने पहाणी करायला सांगतो, असे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. तर विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी श्री. शानभाग यांच्यापुढेही ही योजना मांडली असता हीच जागा योग्य असल्याचे ते म्हणाले. आमच्या माहितीप्रमाणे डेल्टा कॉप या जयदेव मोदी नामक व्यक्तीच्या कसिनोमध्ये जाण्यासाठी याच बाजूने महामागासाठीचा हट्ट आहे. पोलिस बळाला घाबरण्याची मानसिकता आता संपलेली आहे. ‘करो या मरो’ या प्रकारे हे आंदोलन आम्ही पुढे नेणार आहोत.

गोव्यात गेल्या चोवीस तासांत 70 नव्या कोरोना रूग्णांची नोंद

उपमुख्यमंत्री बाबू कालगावकर यांचे याबाबत अजिबात सहकार्य लाभत नसून उलट ते शेतकऱ्यांची थट्टा करतात. यापुढे आम्ही त्यांना लोकशाही पद्धतीने मिळेल तिथे निषेध व्यक्त करणार आहोत. ज्या गरीब शेतकऱ्यावर सरकारने आंदोलन करण्याची वेळ आणली, त्यांच्यावर तुम्ही कसली मर्दुमकी दाखवतात? तुम्हा पोलिस अधिकाऱ्यांना याची लाज वाटायला हवी, असे भारत बागकर म्हणाले. विनायक च्यारी म्हणाले, जो पर्यंत शेतकऱ्यावरील अन्याय दूर होत नाही, तोपर्यंत लढा सुरुच राहील. येथील महिला आता दुर्गा माता झालेला आहेत. शेतकऱ्यांना पिडणाऱ्या राक्षसांचा शेवट जवळ आलेला आहे. संदीप कांबळी म्हणाले, विमानतळाच्या नावावर सुरवातीपासून हुकूमशाही पद्धतीने सरकारने प्रचंड जमीन बळकावण्यास प्रारंभ केला. मनोज साळगावकर, अंकुश आरोंदेकर, रमाकांत तुळसकर, राजेंद्र राऊळ यांनी सरकारच्या हुकुमशाहीने शेतकऱ्यांवर करण्यात येणाऱ्या अत्याचाराच्या निषेध केला.

संबंधित बातम्या