मुरगावमधील अमोनिया टाकीचा प्रश्‍न ऐरणीवर

dainik gomantak
शनिवार, 9 मे 2020

एका वर्षापूर्वी मुरगाव बंदरातून अमोनिया वायूची वाहतूक करणारा टॅंकर चिखली येथे उलटून हाहाकार माजला होता.

मुरगाव, 

विशाखापट्टणम येथे अमोनिया वायू गळतीच्या घटनेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर वास्को येथील मुरगाव बंदरात लोकवस्तीच्या अगदी जवळ असलेल्या झुआरी कंपनीच्या अमोनिया टाकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यासंबंधी सडा येथील जागृत युवक मितेश म्हावळणकर यांनी तक्रार केली आहे.
मुरगाव बंदरात झुआरी कंपनीची अमोनिया टाकी आहे. ही टाकी टाईम बॉम्ब असून, ती मुरगाव बंदरातून हटवावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. परंतु आजपर्यंत जनतेच्या मागणीला कोणीच दाद देत नसल्याने ही प्राणघातक टाकी अजूनही कार्यरत आहे.  गुरुवारी विशाखापट्टणम येथे अमोनिया वायू गळती होऊन निष्पाप लोकांचे बळी गेल्याने मुरगाव बंदरातील अमोनिया टाकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशाखापट्टणम येथील घटनेनंतर सडा येथील जागृत युवक मितेश म्हावळणकर यांनी मुरगाव बंदरात अक्षरशः लोकवस्तीच्या जवळ उभारलेली झुआरी कंपनीची अमोनिया टाकी भविष्यात प्राणघातक ठरू शकते अशी भीती व्यक्त करून तक्रार केली आहे. या टाकीच्या सुरक्षितेसंबंधी कोण जबाबदारी घेऊ शकतो अशी विचारणा श्री. म्हावळणकर यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे.
एका वर्षापूर्वी मुरगाव बंदरातून अमोनिया वायूची वाहतूक करणारा टॅंकर चिखली येथे उलटून हाहाकार माजला होता. तेव्हा नजिकच्या वस्तीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. याची आठवण श्री. म्हावळणकर यांनी आपल्या तक्रारीतून संबंधितांना केली असून, विशाखापट्टणमच्या घटनेची पुनरावृत्ती मुरगाव बंदरातील अमोनिया टाकीमुळे घडू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संबंधित बातम्या