अर्जांचा जलद निपटारा महत्त्वाचा : पी. एस. श्रीधरन पिल्लई

वेर्णा-लोटली दौऱ्यात मंदिर, चर्च, उद्योगांना भेटी
अर्जांचा जलद निपटारा महत्त्वाचा : पी. एस. श्रीधरन पिल्लई
Goa Governor Sreedharan PillaiDainik Gomantak

वास्को : सरकारी विभागांमधील अर्जांचा जलद निपटारा हा केवळ उद्योगाच्या वाढीसाठीच नाही तर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा पैलू आहे, असे प्रतिपादन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले.

राज्यपालांनी आज त्यांच्या पत्नी रिटा यांच्यासमवेत वेर्णा आणि लोटली या त्यांच्या दिवसभराच्या दौऱ्यात मंदिर, उद्योग, चर्च आणि वडिलोपार्जित गावाला भेट दिली. आपल्या देशाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी औद्योगिक विकास हा एक अनिवार्य पैलू आहे. राजकारण्यांनी याबाबत जनतेला प्रबोधन करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

Goa Governor Sreedharan Pillai
आता फक्त जनहिताचे समाजकारण : जीत आरोलकर

राजभवनच्या स्वेच्छानिधीतून आतापर्यंत 350रुग्णांना आर्थिक मदत वाटपाचा लाभ झाला आहे. जनता ही सर्वोच्च असून, प्रत्येक लोकप्रतिनिधीने लोकांच्या हितासाठी काम करणे बंधनकारक असल्याचे ते म्हणाले.

गोव्याला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार काम करत आहे. औद्योगिक क्षेत्राच्या तक्रारी आणि समस्यांचे निराकरण केले जाईल, असे सांगून राज्याच्या उद्योग धोरणाच्या मसुद्यावर उद्योगपतींनी आपली मते आणि सूचना मांडण्याचे आवाहन त्यांनी केले.

राज्यपालांनी वेर्णा औद्योगिक वसाहतीत असलेल्या कॉमस्कोप उद्योगाला भेट दिली. व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अँथनी रेगो यांनी कंपन्यांच्या वतीने स्वागत केले. त्यानंतर त्यांनी सिप्ला कंपनीला भेट दिली. कंपनीच्या वतीने साईटचे प्रमुख संजय मिश्रा आणि पंकज शितोळे यांनी स्वागत केले.

आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी वेर्णा औद्योगिक वसाहत ही राज्यातील प्रथम क्रमांकाची औद्योगिक वसाहत असल्याचे सांगून उद्योगांनी इस्टेटच्या आसपासच्या भागातील स्थानिक तरुणांना रोजगार देण्याचे आवाहन केले. तसेच उद्योगांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी ज्योती कुमारी, राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन, श्वेतिका सचान, वेनान्सियो फुर्तादो, प्रदीप दा कोस्टा आणि सिरिल डिसोझा यावेळी उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते आठ डायलिसिस रुग्णांना आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. राज्यपालांनी सकाळी वेर्णा येथील महालसा नारायणी मंदिरात जाऊन महालसा नारायणी आणि संकुलात असलेल्या इतर देवतांचे आशीर्वाद घेतले. महालसा नारायणी मंदिराचे अध्यक्ष व महालसा नारायणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कमलाक्ष नायक यांनी त्यांचे स्वागत केले. उपाध्यक्ष देविदास सराफ, व्यवस्थापकीय विश्वस्त प्रशांत देशपांडे, उपाध्यक्ष आशिष प्रभुदेसाई, सुहास वेर्णेकर, अजित वेर्णेकर, राजेश बांदोडकर यावेळी उपस्थित होते.

राज्यपालांनी वेर्णाच्या होली क्रॉस चर्चलाही भेट दिली आणि प्रार्थना केली. पॅरिश प्रिस्ट फादर डायगो फर्नांडिस यांनी स्वागत केले. मरिना इंग्लिश हायस्कूल, वेर्णाच्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना नृत्य सादर केले. नंतर त्यांनी पूर्वज गोवा थीम पार्क आणि बिगफूट संग्रहालय, लोटली या संग्रहालयाला भेट दिली आणि क्युरेटर महेंद्र यांच्याशी संवाद साधला.

मतभेद बाजूला ठेवा

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोवा दरडोई उत्पन्नाच्या निर्देशांकात पहिल्या क्रमांकावर आहे. आनंद निर्देशांक मिळवण्याचाही प्रयत्न करा, असे आवाहन करून राज्यपाल म्हणाले, समाजाच्या विकासासाठी राजकारणाचा अडथळा होता कामा नये. इतर सर्व मतभेद बाजूला ठेवून एकता आवश्यक आहे.

गोवा राज्य ही देवाने देशाला दिलेली खास देणगी आहे. गोव्यातील गावांना भेटी दिल्यावर मी पाहिले आहे की शहरांपेक्षा गावे जास्त सुंदर असतात. गोव्याचे लोक मनाने चांगले आहेत.

-पी. एस. श्रीधरन पिल्लई, राज्यपाल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com