दुचाकींसाठीची पार्कींग फी त्वरित मागे घ्या

वार्ताहर
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

म्हापसा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय बर्डे यांची मागणी

म्हापसा: पोर्तुगीज कालीन म्हापसा बाजारपेठेत दुचाकीस्वारांना पार्कींग दर लागू केल्याने म्हापसा नगरपालिकेकडून स्थानिक व्यापारी तसेच पालिका क्षेत्रातील लोकांवर अन्याय केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी म्हापशात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे.

म्हापसा तसेच परिसरातील हजारों स्थानिक  लोक दरदिवशी स्थानिक बाजारपेठेत बाजारहाट करण्यासाठी येत असतात. यावेळी बहुतेक लोक आपल्या दुचाक्या बाजारात पार्क करून बाजारहाट करतात. अनेकदां दिवसांतून तीन-चार वेळा अनेकांचे बाजारात  येणे-जाणें  सर्रासपणे चालुं असते. 

दरम्यान,  गेल्या सहा महिन्यापासून कधी  नव्हे असा नियम लागू करीत म्हापसा नगरपालिका मंडळाकडून नियमित बाजारहाट करण्यासाठी बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या दुचाकी स्वारांना पार्कीग फी लागुं करण्यात आल्याने विनाकारण आर्थिक भुर्दड सहन करावा लागतो त्यामुळे  पालिका क्षेत्रातील लोकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती संजय बर्डे यांनी म्हापशात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, उत्तर गोव्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या येथील मार्केट परिसरात पेडणे पासून डिचोली आणी साखळी पासून वाळपई पर्यतचे हजारों लोक बाजारहाट करण्यासाठी  दरदिवशी म्हापशात प्रवेश करतात मात्र  याआधी येथील बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या दुचाकी स्वारांसाठी  पार्कीग फी लागू करण्यात आली नव्हती परंतु विद्यमान नगराध्यक्ष रायन डिसौझा व पालिका मंडळातील इतर सदस्यांनी गेल्या सहा महिन्यापासून बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी  पार्कीग फी लागू करून जनतेच्या खिशाला आर्थिक भुर्दड पाडल्याचा आरोप बर्डे यांच्याकडून  यावेळी करण्यात आला. 

दुचाकी स्वारांनी म्हापसा बाजारपेठेत  पार्कीग- फी चा धसका घेत म्हापसा तसेच  जवळपासच्या परिसरात बेकायदा धंदा व्यवसाय थाटुन बसलेल्या परप्रांतीय लोकांकडून भाजीपाला तसेच मासळी खरेदी करणे सुरू केले आहे , त्यामुळे नियम मोडून भर रस्त्यात धंदा थाटलेल्यांची संख्या वाढणार असल्याने त्याचा बाजारपेठेतील मुळ व्यवसायिकांवर विपरीत परिणाम होणार असल्याची भीती बर्डे यांनी यावेळी बोलून दाखवली. 

दरम्यान, बाजारपेठेत दुचाकी स्वारांसाठी लागू करण्यात आलेली पार्कीग फी तात्काळ मागे घेत म्हापसा नगरपालिका क्षेत्रातील लोकांची  गैरसोय दूर करण्याची मागणी राष्ट्रवादीचे गोवा प्रदेश सरचिटणीस संजय बर्डे यांनी केली आहे. दरम्यान, याबाबतीत नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांच्या कार्यालयात एक निवेदन राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले.  या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास राष्ट्रवादी पक्ष  पुर्ण ताकदीनिशी म्हापसा बाजारपेठेत स्थानिक लोकांच्या सहकार्याने तीव्र  आंदोलन छेडण्याचा निर्वाणीचा इशारा बर्डे यांच्याकडून देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या