विकासकामाचे श्रेय घेण्यासाठी शर्यत

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

काणकोण येथे अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्याचा काँग्रेसकडून सपाटा

काणकोण: काणकोण मतदारसंघात भाजपचे आमदार उपसभापती इजिदोर फर्नांडिस सत्तास्थानी असताना त्यांनी विकासकामांना सुरवात केल्यानंतर ती कामे कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत सुरू झाल्याचा कांगावा कॉंग्रेस पक्ष करू लागला आहे. त्यामुळे काणकोणात विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी अनोखी शर्यत सुरू झाली आहे. 

सर्वच कामांचे प्रस्ताव काणकोणात कॉंग्रेसचे आमदार होते, त्यावेळी सादर करण्यात आले होते. कॉंग्रेसचा आमदार निवडून देण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी मतदाराकडे मते मागितली होती. त्यामुळे या विकासकामाचे श्रेय घेण्याचा कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पूर्ण अधिकार असल्याचे जनार्दन भंडारी यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष जनार्दन भंडारी, सरचिटणीस महादेव देसाई व नव्यानेच काणकोण गटाध्यक्ष म्हणून निवडून आलेले प्रलय भगत यांनी वेगवेगळे विकासकामांचे विषय हातात घेऊन काही वेळेला अधिकाऱ्यांना घेरण्याचा तर विकासकामे झाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे अधिकाऱ्यांचा हुरूप वाढून नवीन कामे करण्याची ऊर्जा त्यांना मिळत असल्याचा दावा कॉंग्रेसचे जनार्दन भंडारी करीत आहेत. 

कदंब महामंडळाच्या काणकोणमधील बसस्थानकाचे फुटलेल्या पत्र्याच्या छप्परावरून ही स्पर्धा सुरू झाली होती. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी पावसाळ्यात पत्रे बदलण्यासाठी उपसभापती फर्नाडिस यांना बरोबर घेऊन पहाणी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कामाला मंजुरी दिली. मात्र, जिल्हा पंचायतीच्या आचारसंहितेमुळे पत्रे बदलण्याचे काम स्थगित करावे लागले. 

तोपर्यंत पावसाळा सुरू झाला. छपराला गळती लागल्याने येथील दुकानदारांच्या दुकानात पाणी शिरू लागले. यावेळी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जनार्दन भंडारी याच्या नेतृत्वाखाली माडाच्या झावळ्यांनी छप्पर झाकण्याचा अनोखा प्रयत्न केला व तत्कालीन उपजिल्हाधिकारी गावकर यांना निवेदन सादर केले त्यावेळी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बसस्थानकावरील पत्रे एका आठवड्यात न बदल्यास बसस्थानक अन्यत्र हलविण्याचा इशारा दिला. त्यापूर्वीच बस स्थानकाच्या दुरुस्तीसाठी २९ लाख रुपयाची निविदा जाहीर झाली होती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटून कामाबद्दल त्याचे अभिनंदन केले.

या संदर्भात उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांना विचारले असता, प्रस्ताव दिले म्हणून विकासकामे होत नाहीत. त्यासाठी सरकार दरबारी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. ते प्रयत्न केल्यामुळेच आता काणकोणात विकासकामे होत आहेत. मतदारांच्या विकासकामांच्या अपेक्षा पूर्ण करणे आपले पहिले कर्तव्य आहे. काणकोणात कोण विकासकामे करू शकतो, याची पूर्ण जाणीव काणकोणमधील मतदारांना असल्याचे उपसभापती फर्नांडिस यांनी सांगितले.

कामे पूर्ण केल्याबद्दल काँग्रेसकडून अभिनंदन
माशे येथे भूमीगत वीज वाहिनीची जोडणी देण्याचे काम गेली पाच वर्षे स्थगित होते. त्यासंदर्भात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी वीज खात्याच्या अधिकाऱ्यांना घेरले. उपसभापतींनी त्याच्या काही दिवसांपूर्वी वीज खात्याच्या अभियंत्याची बैठक घेऊन ही वीज जोडणी देण्याचे निर्देश अभियंत्यांना दिले होते. दोन दिवस खपून वीज कर्मचाऱ्यांनी उपसभापतीच्या उपस्थितीत हे काम पूर्ण केले. काम पूर्ण केल्याबद्दल कॉंग्रेसच्या जनार्दन भंडारी, महादेव देसाई, प्रकल्प भगत व विशांत प्रभूगावकर यांनी वीज खात्याच्या स्थानिक साहाय्यक अभियंत्याचे पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले.

रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी
पालिका क्षेत्रातील सकरेव्हाळ रस्त्याचा प्रश्न कॉंग्रेस नेत्यांनी हाती घेतला आहे. त्यासाठी हल्लीच त्यांनी ग्रामीण रस्ते विभागाच्या सहाय्यक अभियंत्याची भेट घेऊन गेली चार वर्षे या रस्त्यावर डांबर का पडत नसल्याबद्दल जाब विचारला. मडगाव-कारवार हमरस्त्याच्या चावडी ते नगर्से पर्यंतचा हमरस्ता जलवाहिनी घालण्यासाठी गेल्यावर्षी खणण्यात आला होता. गेल्यावर्षी जलपुरवठा खात्याने त्याची तात्पुरती डागडुजी केली. यंदा पावसाळ्यात तो पुन्हा उखडला आहे त्याची त्वरित डागडुजी करण्याची मागणी यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी केली.

संबंधित बातम्या