
मडगाव : गोव्यातील जुगार अड्ड्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी कारवाई आणखी तीव्र केली आहे. पणजी, म्हापशानंतर आता रामनगरी-कुडतरी येथे गुरुवारी क्राईम ब्रँचने आणखी एका मिनी कॅसिनोवर धाड टाकून एकाला अटक केली. हा कॅसिनो सुनील नाईक नावाचा व्यक्ती चालवत होता. पोलिसांनी त्याला अटक केली असून, 78 हजार रुपयांचे दोन संगणक जप्त केले आहेत.
मडगाव शहराला जुगाराचा विळखा पडला असून, ठिकठिकाणी मटका जुगाराची पाटी लावलेली दिसत आहे. याबरोबरच काही ठिकाणी पत्त्यांचा जुगार, कॅसिनोसह इतर प्रकारचे जुगार चोरीछुप्या पद्धतीने चालत आहेत. आता या जुगारावर पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे.
गांधी मार्केट, ओल्ड मार्केट, जुने बस स्थानक, मेट्रोपॉल, खारेबांद, ओल्ड स्टेशन रोड हे परिसर मटका जुगाराचे प्रमुख अड्डे असून येथे खुल्लमखुल्ला पोलिसांच्या डोळ्यांदेखत रस्त्यालगत मटका व्यवसाय तेजीत सुरु आहे.
काही ठिकाणी पत्त्यांचा जुगारही जोरात सुरू आहे. खारेबांद परिसर त्यासाठी परिचित असून या ठिकाणी गोव्यातील अन्य भागांतून पत्त्यांचा जुगार खेळण्यासाठी माणसे येतात, अशी माहिती मिळाली आहे. काही जुगार अड्ड्यांवर अमलीपदार्थांची सेवाही सहज उपलब्ध होत आहे.
मडगाव शहर जुगाराच्या विळख्यात आकंठ बुडाले आहे आणि स्थानिक पोलिस डोळेझाक करत असल्याने मडगावातील सुजाण नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
मडगाव शहर ही राज्याची आर्थिक राजधानी म्हणून सर्वपरिचित असली तरी या शहराला जडलेला जुगारचा विळखा पाहता भविष्यात ती जुगाराची राजधानी होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान मडगाव येथील एका मिनी कॅसिनो जुगारअड्ड्यावर कारवाई करून 9 जणांना मडगाव पोलिसांनी अटक केल्याने दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी चालणाऱ्या जुगार अड्डेवाल्यांनी आपला व्यवहार काही काळासाठी बंद ठेवण्याचे ठरवले आहे.
मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पोलिसांनी मडगाव येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळ चालत असलेल्या मिनी कॅसिनोवर कारवाई करून 9 जणांना अटक केली होती. याबरोबरच 2 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला होता. त्यामुळे मडगावसह केपे, सावर्डे, कुडचडे, फोंडा या ठिकाणी जुगार अड्डे चालवित असलेल्यांचे धाबे दणाणले असून त्यांनी आपला व्यवसाय काही काळासाठी बंद ठेवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आली होती. या प्रमाणे इतर ठिकाणीही अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती फुटल्याने या जुगार व्यावसायिकांनी आपला धंदाच बंद ठेवला आहे. मडगाव खारेबंद हा परिसर जुगार अड्ड्यासाठी प्रसिद्ध आहे. गोव्यातील अनेक ठिकाणाहून जुगार खेळणारे येथे येत असत. यात मिनी कॅसिनो, सिंडिकेट रमी, तीन पत्ती, बेकायदेशीर लॉटरी अशा प्रकारचे 15 ते 20 च्या आसपास जुगारअड्डे आहेत. यातील काहींनी आपला व्यवसाय इतर ठिकाणी हलवला आहे तर काहींनी काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बरोबरच ग्रामीण भागातील जुगार व्यावसायिकही या कारवाईने धास्तावलेले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.