वाळपईत जुगार अड्ड्यावर छापा

विलास महाडिक
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

अटक करण्यात आलेल्यांची नावे संदिप रोहिदास गावडे (३९ वर्षे, भिरोंडा - सत्तरी), सुभाष गावकर (४२ वर्षे, वाळपई), भिशन रॉय (३६ वर्षे, डिचोली), चंद्रा घाडी (७० वर्षे, साळगाव), मोहन गावकर (४० वर्षे, वेळगे - वाळपई) व दिनेश गावडे (४२ वर्षे, सोनशी - सत्तरी) आहेत.

पणजी

होंडा - वाळपई येथे एका पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून ६ जणांना अटक केली. यावेळी जुगाराच्या ठिकाणी संशयितांची झडती घेतली असता सुमारे दोन लाखांची रोख रक्कम सापडली. जुगार प्रतिबंधक कायद्याखाली संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा जामीनपात्र असल्याने अटकेच्या कारवाईनंतर सुटका करण्यात आली. क्राईम ब्रँचचे निरीक्षक दत्तगुरू सावंत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. 
मिळालेल्या माहितीनुसार होंडा - वाळपई येथील सिम्स बार अँड रेस्टॉरंटच्या परिसरात रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची तसेच इतर भागातील तरुण त्यामध्ये सामील होत असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यामुळे हा छापा आज पहाटेच्यावेळी घालण्यात आला. ‘अंदर - बाहर’ प्रकारातील पत्त्यांचा जुगार सुरू होता. जुगार अड्ड्यावर पोलिसांना छापा घालताच तेथे जुगार खेळणाऱ्यांची झोप उडाली. त्याना पोलिस क्राईम ब्रँचमध्ये आणण्यात आले. त्यांच्या जबान्या नोंदविण्यात आल्या. अटक करण्यात आलेल्यांची नावे संदिप रोहिदास गावडे (३९ वर्षे, भिरोंडा - सत्तरी), सुभाष गावकर (४२ वर्षे, वाळपई), भिशन रॉय (३६ वर्षे, डिचोली), चंद्रा घाडी (७० वर्षे, साळगाव), मोहन गावकर (४० वर्षे, वेळगे - वाळपई) व दिनेश गावडे (४२ वर्षे, सोनशी - सत्तरी) आहेत. गेल्या चार दिवसांपासून संशयित संदीप गावडे याने हा जुगार चालवित असल्याची कबुली दिली आहे. 
दरम्यान, राज्यातील मटका व्यवसाय सध्या बंद असल्याने पत्त्याच्या जुगार मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. राज्यात अनेक भागामध्ये हे जुगार सुरू असल्याने पोलिसांनी त्याविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. 


कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर अनेकजण बेरोजगार झाले आहेत त्यामुळे काहीजण या जुगाराच्या व्यवसायाकडे वळले आहेत. राज्य पोलिसांनी जुगार, वेश्‍या व अंमलीपदार्थ व्यवसाय करणाऱ्या दलालांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. पोलिस महासंचालक मुकेश कुमार यांनी गोव्यात आल्यापासून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत जुगार, वेश्‍या व ड्रग्ज माफिया तसेच दुचाकी चोरांना गजाआड करण्यास पोलिस यशस्वी झाले आहेत. कोविड महामारीच्या काळात रोजगार गेल्याने काही परप्रांतीय जे अजूनही गोव्यात आहेत ते अंमलीपदार्थ विक्री प्रकरणात व चोरीच्या गुन्ह्यात गुंतले आहेत. त्यांच्याकडे उदारनिर्वाहचा काहीच पर्याय नसल्याने ते वाममार्गाला लागले आहेत. 
 

goa goa goa 

संबंधित बातम्या