कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी रेल्वे मंत्रालय कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करणार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

रेल्वे मंत्रालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा ॲनालिटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी चालविली आहे.

नवी दिल्ली :  रेल्वे मंत्रालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा ॲनालिटिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी चालविली आहे. यासाठी रेल्वे मंत्रालयाने हैदराबादेतील इंडियन स्कूल ऑफ बिझिनेस या संस्थेसोबत भागीदारी देखील केली आहे. ही संस्था रेल्वेकडून गोळा करण्यात आलेल्या डेटाचे विश्‍लेषण करण्याचे काम करेल, असे रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी सांगितले.
पुढील तीन महिन्यांमध्ये रेल्वेकडून सेंटर फॉर एक्सलेन्सची स्थापना करण्यात येईल. रेल्वेच्या प्रत्येक झोनमध्ये आता चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर  नेमण्यात येणार असून या अधिकाऱ्याचे काम हे अॅनालिटिक्स आणि आर्टिफीशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते मुख्य यंत्रणेमध्ये आणणे हे असेल, असे यादव यांनी स्पष्ट केले.

‘पीआरएस’साठी माहितीचा वापर
आमच्याकडे प्रवासी, रेल्वे गाड्या, माल वाहतूक आणि मालमत्तेविषयीची माहिती मोठ्या प्रमाणावर आहे. आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲनालिटिक्स यांचा वापर करून त्याचे विश्‍लेषण करू. पुढे याच माहितीचा वापर हा पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिममध्ये (पीआरएस) केला जाणार आहे. नव्या गाड्यांची सुरूवात आणि भविष्यातील मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी देखील याचा वापर करण्यात येईल असे यादव यांनी नमूद केले.

कशाचे प्रशिक्षण?
अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये क्लाउड कॉम्प्युटिंग. डेटा सायन्स, बिग डेटा ॲनालिटिक्स, आणि आर्टीफिशीयल इंटेलिजन्स आदी घटकांचा समावेश असेल. रेल्वेच्या प्रत्येक झोनमध्ये हा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी नेमला जाणार असून त्याच्याच जोडीला सहाय्यक मुख्य तंत्रज्ञान अधिकारी देखील असेल. हे दोन्ही अधिकारी थेट मुख्य व्यवस्थापक आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना आपल्या कामाची माहिती देतील.

संबंधित बातम्या